ठाण्यात संपावर गेलाय "रिक्षावाला", प्रवाशांची तारांबळ
By admin | Published: May 25, 2017 08:48 AM2017-05-25T08:48:35+5:302017-05-25T08:58:36+5:30
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 25 - ठाण्यातील रिक्षाचालकांनी आज संप पुकारला असून यामुळे लोकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जाव लागणार आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रिक्षाचालकांविरोधात केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. ठाणे शहर ऑटो टॅक्सी संघर्ष कृती समितीने संपाची हाक दिली आहे. पालिका आयुक्तांनी ठाण्यातील फेरीवाले आणि रिक्षा चालकांवर गेल्या दोन आठवड्यांपासून कारवाई सुरु केली आहे. 11 मे रोजी गावदेवी आणि स्टेशन परिसरात झालेल्या कारवाईच्यावेळी रिक्षा युनियनचे नेते राजू सावंत यांच्यासह काही रिक्षाचालकांना मारहाण झाल्याचा आरोप आहे.
दरम्यान पालिका आयुक्त आणि रिक्षाचालकांच्या या वादामुळे प्रवाशांना मात्र अनेक समस्यांना सामोरं जाव लागणार आहे. संपामुळे सकाळच्या वेळी कामावर निघालेल्या प्रवाशांची मात्र धावपळ होत आहे. ठाणे शहरात अनेकजण रिक्षानेच प्रवास करत असल्याने रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. संपामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे.
रिक्षा बंद ठेवून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आलं आहे. रिक्षा चालकांबरोबरच फेरीवालेही संपावर जाणार असल्याचं फेरीवाला संघटनेनं स्पष्ट केलं आहे.