मन : शांतीसाठी हा सायकलवरून निघाला जगाच्या सफरीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 05:18 PM2019-06-29T17:18:54+5:302019-06-29T17:23:59+5:30
३५ वर्षीय आयर्लंडचा युवक भ्रमती करीत सोलापूर गाठलं
रवींद्र देशमुख
सोलापूर: माईक फिन.. जेमतेम ३५ वर्षाचा आयर्लंडचा युवक. होटगी रस्त्यावरून वेगाने सायकलिंग करत निघाला होता. राहण्यासाठी त्याला एक हॉटेल हवं होतं. भारतात कशासाठी आलात?.. सहजच माईकला थांबवून प्रश्न विचारला, तो म्हणतो कसा.. कामाच्या व्यापातून मुक्त होऊन मन : शांतीसाठी इथे आलोय. रिलॅक्स राहण्याची माझी हीच पद्धत आहे !
आसरा चौकातून सात रस्त्याच्या दिशेने सायकलवरून निघालेल्या माईकला शनिवारी दुपारी जेव्हा थांबवलं, तेव्हा त्यांनं हसून प्रतिसाद दिला. कुठून आलात? कशासाठी आलात? काय करता? हे जुजबी प्रश्न विचारल्यानंतर माईक बोलायला लागला.. आयर्लंडला माझा व्यवसाय आहे. जेव्हा मला सुट्टी हवी असते; मन:शांतीची गरज असते; तेव्हा मी सायकलवरून निघतो. यावेळी जगाची सफर करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत २५ देशांची सफर केलीय. दहा दिवसांपूर्वी विमानाने सायकल घेऊन मुंबईत उतरलो. मुंबई ते विजयवाडा असा सायकल प्रवास करण्याचा माझा मानस आहे..तो सांगू लागला.
भारतात काय पाहायचं ठरवलंय? यावर तो म्हणाला, तसं निश्चित काही ठरवलं नाही. सायकलिंग करणं, ही माझी पॅशन आहे यातूनच मला मन : शांती लाभते. एका देशाचा दौरा झाला की, लगेच मी दुसºया देशात जातो आणि सायकलिंग करता करता तेथील लोकांशी संवाद साधतो. पर्यटन स्थळंही पाहतो.
भारताबद्दल काही ठाऊक आहे का? हे विचारल्यानंतर माईक भरभरून बोलू लागला.. भारत खूप मोठा देश आहे. इथली लोकसंख्याही भरपूर आहे. भारतीय लोक चांगले आहेत, हे मी ऐकलंय आणि आता अनुभवतोय.. माईकने प्रशंसा केली. त्याला किफायतशीर दरात हॉटेल शोधायचे असल्यामुळे 'ग्लॅड टू मीट यू' ..'बाय बाय' म्हणत तो महावीर चौकाच्या दिशेने निघून गेला.
-