भरतीच्या गुणदानात ‘हेराफेरी’
By Admin | Published: May 23, 2016 04:38 AM2016-05-23T04:38:02+5:302016-05-23T04:38:02+5:30
पोलीस पाटील, कोतवाल भरतीत निफाड प्रांत अधिकाऱ्याने घातलेल्या गोंधळाचे अनेक किस्से बाहेर पडू लागले असून, उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गुणांकन करण्याच्या
नाशिक : पोलीस पाटील, कोतवाल भरतीत निफाड प्रांत अधिकाऱ्याने घातलेल्या गोंधळाचे अनेक किस्से बाहेर पडू लागले असून, उमेदवारांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गुणांकन करण्याच्या पद्धतीत फक्त दहावी उत्तीर्णला प्राधान्य देताना पदवीधराला मात्र घरचा रस्ता दाखविल्याचेही उघडकीस आले आहे.
एवढेच नव्हेतर चांगले गुणांकन मिळूनही ‘पर्सनालिटी’ म्हणजेच चेहरेपट्टी चांगली नसल्याचे कारण दाखवून एका महिला उमेदवाराला अपात्र ठरवित दुसरीची शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती अधिकारात प्राप्त झालेले पुरावेच उमेदवारांनी ‘लोकमत’कडे सोपवून यासंदर्भात शासन दरबारी दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
नांदुर्डी येथील मीना कुंभार्डे या पदवीपात्र महिलेला अपात्र ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे ८० गुणांच्या लेखी परीक्षेत कुंभार्डे यांना ४९ गुण मिळाले तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुनीता सूर्यवंशी व आशा निकम यांना प्रत्येकी ४२ गुण मिळालेले असताना मुलाखतीतच निफाड प्रांत अधिकाऱ्याने गुणदानात हेराफेरी केल्याचे कुंभार्डे यांचे म्हणणे आहे. आशा निकम ही महिला फक्त दहावी उत्तीर्ण असून, तिला दहावीत ५० टक्क्याच्या आतच गुण मिळालेले असताना प्रांत अधिकाऱ्याच्या मेहेरबानीने थेट १६ गुण मुलाखतीत देण्यात येऊन तिला पात्र ठरविण्यात आले, तर सुनीता सूर्यवंशी ही महिलादेखील दहावी उत्तीर्ण व ५० टक्के गुण मिळालेले असताना त्यांना १४ गुण मुलाखतीत देण्यात आले.