तोंडी परीक्षा बंदचा निर्णय योग्यच
By admin | Published: July 15, 2017 03:19 AM2017-07-15T03:19:52+5:302017-07-15T03:19:52+5:30
तोंडी परीक्षा बंद करण्याच्या राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे ठाण्यातील शैक्षणिक वर्तुळातूनही स्वागत होत आहे.
स्नेहा पावसकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : नववी आणि दहावीच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा बंद करण्याच्या राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे ठाण्यातील शैक्षणिक वर्तुळातूनही स्वागत होत आहे. हे गुण देण्याबाबत काही शाळांनी केलेला अतिरेक याला कारणीभूत असल्याचे मत काही आजीमाजी मुख्याध्यापकांनी व्यक्त केले असून विद्यार्थ्यांनी मात्र या निर्णयावर काहीशी नाराजी व्यक्त केली.
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची सध्या भाषा, द्वितीय भाषांच्या २० गुणांच्या तोंडी परीक्षा घेतल्या जातात. त्याची मुभा शाळांना होती. मात्र, बहुतांशी शाळांकडून विद्यार्थ्यांना पूर्ण गुण दिले जात असल्याने त्या बंद करण्याचा झालेला निर्णय योग्य असल्याच्या प्रतिक्रिया ठाण्यात उमटू लागल्या. अनेक शाळांकडून याचा दुरुपयोग केला जायचा. खरे पाहता, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने पूर्वीच्या शासनाने तोंडी परीक्षेचा निर्णय घेऊन त्याचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी शाळांना दिली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत पूर्ण गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतेच आहे आणि त्याला शाळांकडून सरसकटपणे दिले जाणाऱ्या तोंडी परीक्षेचे गुणच कारणीभूत असल्याचे मत मुख्याध्यापकांसह काही शिक्षकांनी व्यक्त केले.
आम्ही ज्या काळी विद्यार्थी होतो, तेव्हा तोंडी परीक्षा नव्हत्या. मात्र, मध्यंतरी भाषा विषयांच्या तोंडी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. त्याचे कारण भाषा ही केवळ लिहिण्याने नाही, तर बोलण्याने समृद्ध होते. लिहिण्याबरोबरच मुलांमध्ये भाषा गेय, ताल, लयबद्धतेत बोलण्याची कला आहे का, याचे मूल्यमापन तोंडी परीक्षेत केले जायचे. पण, काही शाळांनी याचा दुरुपयोग करून मुलांना पूर्णगुण दिले. त्यामुळे पूर्ण गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. सरकारचा निर्णय योग्यच आहे.
- राजेंद्र राजपूत, मुख्याध्यापक, मो.ह.विद्यालय
तोंडी परीक्षा बंद करण्याचा निर्णय योग्यच आहे. गेल्या काही वर्षांत काही शाळांनी या परीक्षांचे गुण देण्याबाबत अक्षरश: कहर केला होता. अशा शाळांना, शिक्षकांना चाप बसेल. १०० गुणांच्या लेखी परीक्षेतून आता खरे गुणी विद्यार्थी असतील, ते पुढे येतील, असे वाटते.
- ज्योती परब, मुख्याध्यापिका,
संकल्प इंग्लिश स्कूल
राज्य शासनाचा निर्णय १०० टक्के योग्य आहे. अनेक शाळा ज्या मुलांना धड बोलताही येत नाही, त्यांना तोंडी परीक्षेचे पूर्ण गुण द्यायच्या. याला आता आळा बसेल. ५-१० टक्के शाळा वगळता उर्वरित शाळांमध्ये हाच प्रकार व्हायचा. त्या गुणांमुळे विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना कोणालाच मानसिक समाधान मिळत नव्हते. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे.
- संध्या धारडे, माजी मुख्याध्यापिका
तोंडी परीक्षांचे गुण हक्काचे असायचे. त्यातही आमच्याकडून कविता पाठांतर किंवा वाचन करून घेतले जायचे किंवा आमच्या गृहपाठाच्या वह्या पूर्ण आहेत का, हे तपासले जायचे आणि त्यानुसारच शिक्षक गुण द्यायचे. त्यामुळे गृहपाठ, निबंध वह्या पूर्ण करणे, या अभ्यासाचीही दखल घेतली जायची. मात्र, आता १०० गुणांच्या पूर्ण लेखी परीक्षेच्या घेतलेल्या निर्णयामुळे या कवितावाचन, वर्ग-गृहपाठ या अभ्यासाचे महत्त्व फारसे राहणार नाही, असे वाटते. हा निर्णय काहीसा अयोग्य वाटतो.
- महिमा जोशी, विद्यार्थिनी
सगळ्याच शाळा काही विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे पूर्णच्या पूर्ण गुण देत नव्हत्या. तोंडी परीक्षेतील उत्तरानुसार गुण दिले जायचे. त्यातच काही विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेचे दडपणही असते. मात्र, तेच विद्यार्थ्यांची प्रश्नांची उत्तरे तोंडी सहज देतात. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थ्यांना या तोंडी परीक्षा सोप्या जायच्या. मात्र, त्याच बंद करण्याच्या जो निर्णय झाला आहे, तो चुकीचा वाटतो. विद्यार्थ्यांचा विचार करून त्यात काही बदल व्हावेत, असे वाटते.- पराग राजुले, विद्यार्थी