‘रिक्षा, वडापाव’मधून मराठी तरुण सुटले!

By admin | Published: April 29, 2016 04:04 AM2016-04-29T04:04:23+5:302016-04-29T04:04:23+5:30

तरुणांना वेगवेगळ््या क्षेत्रातील नोकरीच्या संधीकरिता मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु झाला आहे.

'Riksha', 'Vadapav' | ‘रिक्षा, वडापाव’मधून मराठी तरुण सुटले!

‘रिक्षा, वडापाव’मधून मराठी तरुण सुटले!

Next

ठाणे : ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरात वास्तव्य करणारे शिक्षक, प्राध्यापक, वेगवेगळ््या कंपन्यांमधील मॅनेजर, आर्कीटेक्ट, वकील, उद्योजक यांनी एकत्र येऊन ‘भारतीय ग्रॅज्युएटस’ हा मंच स्थापन केला असून त्यामार्फत मराठी बेरोजगार तरुणांना वेगवेगळ््या क्षेत्रातील नोकरीच्या संधीकरिता मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु झाला आहे.
भारतीय ग्रॅज्युएटसमध्ये प्रशिक्षण घेतलेल्यांना शिवसेनेच्या रोजगार विभागामार्फत नोकऱ्या मिळू लागल्या आहेत. मराठी माणसाने केवळ रिक्षा चालवायची किंवा वडापावच्या गाड्या टाकून पोट भरायचे ही मानसिकता चुकीची असून अनेक वेगवेगळ््या सेवा क्षेत्रात मराठी तरुणांकरिता नोकऱ्या उपलब्ध आहेत. पण त्याचे कौशल्य त्यांच्याकडे नाही ही बाब शिवसेनेच्या रोजगार विभागाचे अध्यक्ष विनायक प्रभू यांच्या निदर्शनास काही तज्ज्ञांनी आणून दिली. वानगीदाखल नेत्ररोग चिकित्सकांकडे आॅप्टोमेट्रीस्टची कमतरता आहे. इस्पितळांमधील आॅपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रियांची उपकरणे निर्जंतूक करण्याकरिता ब्रदर्स नाहीत. अनेक मोबाईल व फायनान्स कंपन्यांच्या बॅकआॅफीसमध्ये खूप मोठी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. राजकीय नेते व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचे सोशल मीडिया विभाग हाताळण्याकरिता सोशल मीडिया एक्झीक्युटीव्हची गरज आहे. अनेक बड्या कंपन्या, बिल्डर यांना लायझनिंगची कामे करण्याकरिता माणसांची गरज आहे. प्रभू यांनी काही तज्ज्ञांना शिवसेनेच्या रोजगार विभागाशी जोडून घेण्याची विनंती केली. मात्र कुठल्याही राजकीय पक्षासोबत थेट जोडून घेण्यास तज्ज्ञांनी नकार दिल्याने दीड महिन्यांपूर्वी भारतीय ग्र्रॅज्युएटसची स्थापना झाली. मार्गदर्शनामुळे जादूची कांडी फिरल्यागत मराठी तरुण-तरुणींना बिर्ला, टाटा, रिलायन्स आदी कंपन्यांत नोकऱ्या मिळू लागल्या. या मंचाच्या मांडवाखालून गेलेल्या १०० मुला-मुलींना अलीकडेच बड्या कंपनीत नोकरी मिळाली.
प्रभू म्हणाले, प्रशिक्षण कार्यक्रमात कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य यावर भर दिला जातो. बायोडेटाविषयी विशेष मार्गदर्शन केले जाते. नोकरीची प्रक्रिया समजावली जाते. उमेदवारांचे शिक्षण पाहून योग्य ती नोकरी किंवा व्यवसाय सूचित केला जातो. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बेरोजगार मराठी तरुणांनी भारतीय ग्रॅज्युएटसचे मार्गदर्शन घेतले तर त्यांना अधिक लाभ होईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आनंदाश्रम, टेंभीनाका, ठाणे येथे सायं. ७ ते ९ यावेळेत या पत्त्यावर संपर्क साधावा. कार्याध्यक्ष सुरेश मोहिते, सरचिटणीस मंगेश वाळंज, चिटणीस सुहास काकडे हे काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Riksha', 'Vadapav'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.