दंगली घडवण्याचे प्रयोग; नवहिंदू ओवेसींच्या खांद्यावर भाजपची बंदूक - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 07:56 AM2022-04-18T07:56:55+5:302022-04-18T07:57:43+5:30
राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर राज्यात तणाव निर्माण करण्याचा आरोप केला. तसेच नवहिंदू ओवेसींच्या माध्यमातून भाजप हे काम करवून घेत असल्याचा आरोप केला. मात्र, राऊत यांनी थेट नाव घेण्याचे टाळले.
मुंबई : उत्तर प्रदेशातील निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने एमआयएमच्या ओवेसींचा वापर केला. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात हिंदू समाजात काही ओवेसी निर्माण करण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रात फूट पाडण्याचे, दंगली घडविण्याचे आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरू असल्याचा आरोप शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर राज्यात तणाव निर्माण करण्याचा आरोप केला. तसेच नवहिंदू ओवेसींच्या माध्यमातून भाजप हे काम करवून घेत असल्याचा आरोप केला. मात्र, राऊत यांनी थेट नाव घेण्याचे टाळले. हे मी कोणाचे व्यक्तिगत नाव घेऊन बोलत नाही. महाराष्ट्रातील ओवेसींच्या माध्यमातून प्रयत्न आहेत; परंतु महाराष्ट्राची जनता अत्यंत सावध आहे, जागरूक आहे, संयमी आहे आणि ज्ञानी आहे, एवढेच मी सांगेन. देशभरातील दंगलीचा व्यापक कट आहे आणि जे दिल्लीत घडले ते महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे; परंतु यशस्वी होणार नाहीत, असेही राऊत म्हणाले.
योग्य वेळी बोलेन - राज ठाकरे
संजय राऊत व अन्य नेत्यांनी केलेल्या आरोपाबाबत पुण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले, त्यावर मी बोलणार नाही. ते काही बोलले की आम्ही बोलणार, ते पुन्हा बोलणार. मी योग्य वेळी बोलेन.
‘ही राजकीय नाही तर श्रद्धेची यात्रा’
राऊत यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही भाष्य केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना राम मंदिराच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होती. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख तिकडची परिस्थिती पाहून ठरवली जाईल. मात्र, ही काही राजकीय यात्रा नाही, श्रद्धेची यात्रा आहे, असे संजय राऊत म्हणाले.