राजकारणापायी दंगली घडवल्या जातात - शिवसेना
By Admin | Published: October 11, 2015 11:52 AM2015-10-11T11:52:02+5:302015-10-11T11:55:19+5:30
निवडणूक जिंकायची असेल हिंदू - मुस्लिम दंगली घडवायच्या आणि त्या आगीवर राजकीय भाकरी भाजायची हे गणितच बनले आहे असे परखड मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - देशात राजकीय कारणासाठी धार्मिक तेढ निर्माण केली जात असून निवडणूक जिंकायची असेल हिंदू - मुस्लिम दंगली घडवायच्या आणि त्या आगीवर राजकीय भाकरी भाजायची हे गणितच बनले आहे असे परखड मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले आहे. दादरीसारख्या घटनांमध्ये कठोर कारवाई करण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना दिली असली तरी मुळात धार्मिक तेढ कोण वाढवतंय असा सवालही त्यांनी भाजपाला उद्देशून विचारला आहे.
रविवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊत यांनी गोमांस वादावर 'रोखठोक' मतं मांडली आहे. १९९१ मध्ये भाजपाच्या अयोध्या आंदोलनानंतर देश मनाने दुभंगला आणि अजूनही ही दरी रुंदावतच आहे. नोएडीतील दादरी येथे गोमांसच्या वादावरुन एका मुस्लिम तरुणाची झालेली हत्या हे त्याचे उदाहरण आहे. गोमांसाच्या तुकड्यावर देशातील धार्मिक तेढ शिगेला पोहोचली आहे असे राऊत यांनी म्हटले आहे. देशाला नव्या आगीत ढकलणारे हे चित्र असून दादरीतील गोमांस हत्येचा वापर बिहारच्या निवडणुकीत कसा करता येईल यासाठी सेक्यूलरवाद्यांकडून राजकीय डावपेच आखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबईत जैन धर्मीयांच्या पर्युषणादरम्यान मांसविक्रीवर बंदी टाकण्याची मागणी करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही मागणी केली गेली असे सांगत राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तर आझम खान यांनी दादरीप्रकरणानंतर संयुक्त राष्ट्राला केलेली तक्रार हादेखील धार्मिक तेढ वाढवण्याचा भाग आहे अशी टीकाही त्यांनी केली. शेतकरी आत्महत्या करतोय, भ्रष्टाचार, महागाईमुळे माणूसच माणसाला खातोय. यावरुन कोणाचे धर्म खवळत नाही पण गोमांसच्या अफवेवरुन देश दुभंगतो अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.