छोटा शकीलच्या मृत्यूच्या अफवेचे पीक, सोशल मीडियावर खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:28 AM2017-12-21T03:28:32+5:302017-12-21T03:31:15+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम आणि त्याचा हस्तक मोहम्मद शकील बाबू मियान शेख उर्फ छोटा शकील (५७), हे दोघे वेगळे झाल्याची चर्चा सुरू असतानाच बुधवारी छोटा शकीलच्या मृत्यूच्या बातमीची यात भर पडली.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम आणि त्याचा हस्तक मोहम्मद शकील बाबू मियान शेख उर्फ छोटा शकील (५७), हे दोघे वेगळे झाल्याची चर्चा सुरू असतानाच बुधवारी छोटा शकीलच्या मृत्यूच्या बातमीची यात भर पडली. सोशल मीडियावर दिवसभर या वृत्ताने खळबळ उडवली होती. अशात शकीलच्याच प्रतिक्रियेचा मेसेज आला. अफवा पसरविणा-याचा मी शोध घेत असल्याचे प्रतिक्रियेत नमूद करण्यात आल्याने अफवांचे वादळ थंडावले.
‘पहिल्या वृत्तात आयएसआयने छोटा शकीलला ठार केले. त्याचा मृतदेह दोन दिवस शवागरामध्ये ठेवल्यानंतर विमानाने कराची येथे नेण्यात आला आणि तेथेच त्याचा दफनविधी पार पडला, असे म्हटले होते. तर दुसºया वृत्तात शकील कराचीमध्ये त्याची दुसरी बायको आयेशासोबत राहतो. ६ जानेवारीला इस्लामाबाद येथे साथीदारांना भेटण्यासाठी गेला असताना हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला,’ असे सांगण्यात आले.
बुधवार सकाळपासून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाºयांपासून अन्य अधिकाºयांच्या मोबाइलवर या वृत्तासंदर्भातील संदेश येत होते. त्यात माध्यमांच्या ग्रुपवरही या संदेशाने खळबळ उडवली. सोशल मीडियावर या वृत्ताच्या सविस्तर माहितीने नानाविध चर्चा रंगल्या. या वृत्ताबाबत तपास यंत्रणांकडून काहीच माहिती येत नसल्यामुळे या अफवा वाढत होत्या. अखेर छोटा शकीलची प्रतिक्रिया व्हायरल झाल्याने या अफवांचे वादळ थंडावले.
‘माझ्या नावाने व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिपमधील आवाज माझा आहे की नाही, हे तपास यंत्रणांनी शोधावे. माझ्या मृत्यूबाबत अफवा पसरवित असलेल्या व्यक्तीचा मी स्वत: शोध घेत आहे’, असे या प्रतिक्रियेत नमूद करण्यात आले होते. मात्र, या दिवसभराच्या वृत्ताबाबत मुंबई पोलीस दल, तसेच तपास यंत्रणांकडून काहीही माहिती समोर आलेली नाही.
अफवा पसरविणा-याचा शोध घेत आहे-
छोटा शकीलच्या मृत्यूच्या अफवेने सर्वत्र खळबळ उडाली आणि त्याची दखल थेट छोटा शकीलनेच घेतली.
अफवा पसरविणा-याचा मी शोध घेत असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. त्यानंतर अफवांचे वादळ थंडावले.