ऋषीतुल्य व्यक्तिमत्व लोपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 05:02 AM2019-07-14T05:02:20+5:302019-07-14T05:03:13+5:30
महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांच्या हातून घडलेली एक अजोड लेखनकृती म्हणजे ‘डॉन आॅफ सिव्हिलायझेशन आॅफ महाराष्ट्र’.
कसारा/वासिंद : इतिहासाचे गाढे अभ्यासक पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या निधनामुळे इतिहासाचा जाणकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गोरक्षकर यांच्यावर शनिवारी संध्याकाळी ५ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र मुकुंद यांनी पार्थिवाला अग्नी दिला. याप्रसंगी शहापूर तहसीलदार रवींद्र बाविस्कर व वासिंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजू वंजारी उपस्थित होते. गोरक्षकर यांना पोलिसांनी मानवंदना दिली. या वेळी चित्रकार विजयराज बोधनकर, सुहास बहुळकर, इतिहासाचे अभ्यासक सदाशिव टेटविलकर, श्रीनिवास साठे आदी मान्यवर तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विठ्ठल भेरे, भाजपा शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे वासिंद शहर अध्यक्ष संदीप पाटील आदी सहभागी झाले होते. त्यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी व्यक्त केलेल्या या भावना.महाराष्ट्राच्या दृष्टीने त्यांच्या हातून घडलेली एक अजोड लेखनकृती म्हणजे ‘डॉन आॅफ सिव्हिलायझेशन आॅफ महाराष्ट्र’. यात त्यांनी उत्खननातून हाती आलेल्या तिसऱ्या शतकातील महाराष्ट्रातील ऐतिहासिक नमुन्यांच्या आधारे महाराष्ट्राचा दीर्घ प्रवास अधोरेखित केला आहे. तसेच त्यांनी पश्चिम भारतातील गुप्तकालीन शिल्पकलेवरही लेखन केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन २००३ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने गौरविण्यात आले होते. २०१६ मध्ये त्यांना चतुरंगचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. कोकण इतिहास परिषदेनेही त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते.
इतिहास व वारसा जतन क्षेत्रातील योगदान अजोड
सदाशिव गोरक्षकर यांचे इतिहास आणि वारसा जतन क्षेत्रातील योगदान अजोड होते. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे संचालक या नात्याने त्यांनी देश-विदेशात अनेक प्रदर्शने भरवली व भारताचा श्रीमंत वारसा जगासमोर आणला. राज्यातील गव्हर्नमेंट हाउसेस व राजभवनांचा इतिहास सांगणारा गोरक्षकर यांचा ‘महाराष्ट्रातील राजभवने’ हा अभ्यासपूर्ण ग्रंथ भावी संशोधकांसाठी अतिशय मोलाचा आहे. त्यांच्या निधनामुळे इतिहास व वारसा क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व लोपले आहे.
- सी. विद्यासागर राव, राज्यपाल
समर्पित व्यक्तिमत्त्व हरपले
ज्येष्ठ वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाने भारतीय इतिहासाचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आयुष्य वेचलेले एक समर्पित व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांचा या विषयांवरचा व्यासंग जोपासतानाच ऐतिहासिक वस्तुंच्या जतनासाठी त्यांनी कृतीशिल प्रयत्न केले.वस्तुसंग्रहालयाशी संबंधित विषयांतील त्यांचा अधिकार फार मोठा होता. याशिवाय आपल्या लिखाणाच्या माध्यमातून देशाच्या समृद्ध इतिहासाची ओळख इथल्या वर्तमान पिढीला करुन देण्यासाठी त्यांनी निष्ठेने प्रयत्न केले.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
उल्लेखनीय कार्य
भारतीय इतिहासाची अचूक जाण असणारे आणि त्याची जपणूक करणारे लेखक, कला समीक्षक, संग्रहालय तज्ज्ञ सदाशिव गोरक्षकर यांचे संग्रहालय शास्त्रातील योगदान अमूल्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी आयुष्यभर संग्रहालय शास्त्रासाठी समर्पण केले होते. भारतात एकीकडे संग्रहालयाची असणारी दुरवस्था आणि दुसरीकडे गोरक्षकर यांचे योगदान हे खूप उल्लेखनीय आहे. त्यांनी संग्रहालय शास्त्राविषयी जिव्हाळा असणारी दुसरी पिढीही घडवली, ते कार्य चिरंतन सुरू व्हावे या विचारातून त्यांनी हे केले.
- वासुदेव कामत, ज्येष्ठ चित्रकार
कलासंग्रहालय शास्त्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व
सदाशिव गोरक्षकर यांचा जन्म ३१ मे १९३३ रोजी झाला. एमए, एलएलबी तसेच वस्तुसंग्रहालय शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले होते. त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली. त्यांनी विविध विषयांवरील संग्रहालयांचे व खास प्रदर्शनांचे आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय त्यांनी ‘नॅशनल म्युझियम आॅफ रेव्हॉल्युशनरीज्’, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक - मुंबई, मुंबई हायकोर्टाचा इतिहास, मुंबई पोलीस दलाचा इतिहास, सुप्रीम कोर्टाचा इतिहास, ओ.एन.जी.सी.चे डेहरादून येथील ‘तेल’ (आॅइल) या विषयावरील संग्रहालय अशा अनेक प्रदर्शने व संग्रहालयांची निर्मिती केली. गोरक्षकरांच्या निधनाने एक उत्तम अभ्यासक, कर्तव्यनिष्ठ प्रशासक आणि कलासंग्रहालय शास्त्रातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले. त्यांच्या स्मृतीस शतश: नमन!
- सुहास बहुळकर, ज्येष्ठ चित्रकार
संवर्धनशास्त्राचे धडे गिरवले
१९८९ साली उमेदीच्या काळात सरांकडून शिकायला मिळाले. त्यांना कोणत्याही गोष्टीत निष्काळजीपणा केलेला चालायचा नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन, जतनकला शास्त्राचे धडे गिरविले. त्या काळात प्रत्येक परदेशी दौºयाच्या वेळी सर आठवणीने भेटवस्तू घेऊन यायचे. त्यांची शिस्त कडक होती; मात्र तितक्याच आपुलकीने शिष्यवर्गांशी ते जोडलेले होते. त्यांच्या स्मृती, त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.
- मनीषा नेने, संचालक, कलादालन आणि प्रशासकीय विभाग, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय