Electricity Bill: वाढीव वीज बिलाचा पुन्हा शॉक! दरवाढ लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 06:36 AM2021-04-22T06:36:15+5:302021-04-22T06:36:29+5:30
३०० हून अधिक युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर निर्बंध लागू झाले असून, पुन्हा एकदा अनेक ठिकाणी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले आहे. संचारबंदीमुळे कुटुंब घरात कैद झाली आहेत. उन्हाळा घामाघूम करत आहे. परिणामी विजेच्या उपकरणांचा वापर वाढला असतानाच आता १ एप्रिलपासून निवासी ग्राहकांच्या स्थिर आकारासह स्लॅबनुसार प्रतियुनिट वाढ झाली आहे. त्यामुळे विजेचा वाढलेला वापर आणि वीज दरात झालेली वाढ वीज ग्राहकांना शॉक देणारी आहे.
महावितरणकडून वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. वीज नियामक आयोगाकडे दाखल झालेल्या प्रस्तावास मान्यताही मिळाली आहे. बहुवार्षिक वीज दरवाढीच्या प्रस्तावानुसार दरवर्षी
१ एप्रिल रोजी वीज दरवाढ लागू करण्याचे अधिकार महावितरणकडे आहेत, त्यामुळे आता याच कारणामुळे १ एप्रिलनंतर येणारी वाढीव वीज दराची बिले वीज ग्राहकांना शॉक देणार आहेत.
उन्हासह वाढीव बिल घाम काढणार
५०० युनिटच्या पुढे वीज वापर असलेल्या ग्राहकांचा स्थिर आकार दर १०० वरून १०२ रुपये केला आहे. काेराेनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ‘वर्क फ्राॅम हाेम’ सुरू असून उकाड्यामुळे वीज वापर वाढला आहे. त्यामुळे उन्हासह वाढीव बिल घाम काढणार असल्याची नाराजी ग्राहकांमध्ये आहे.
या ग्राहकांना दिलासा
n१ ते १०० युनिट विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रतियुनिट ३ रुपये ४४ पैसे मोजावे लागतील. जुना दर ३ रुपये ४६ पैसे आहे. म्हणजे या वर्गवारीतील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
n१०१ ते ३०० युनिटमधील ग्राहकांना ७ रुपये ३४ पैसे मोजावे लागणार. जुना दर ७ रुपये ४३ पैसे आहे. म्हणजे यांनाही झळ बसणार नाही.
यांना बसणार झळ
n३०१ ते ५०० युनिटमधील ग्राहकांना १० रुपये ३६ पैसे मोजावे लागतील. जुना दर १० रुपये ३२ पैसे आहे. येथे मात्र ग्राहकांना वाढीव बिल भरावे लागेल.
n५०० आणि त्या पुढील युनिटच्या ग्राहकांना ११ रुपये ८२ पैसे मोजावे लागतील. जुना दर ११ रुपये ७१ पैसे आहे.
महावितरणचे म्हणणे काय?
० ते ३०० युनिटमध्ये २ पैसे कमी झाले आहेत. गरीब माणूस किंवा मध्यमवर्गीयांना दिलासा आहे.
कारण या वर्गवारीत हेच ग्राहक असतात. ज्यांचा विजेचा वापर जास्त आहे किंवा एसीसारखी मोठी उपकरणे वापरली जातात, ज्यांचा वीज वापर ३०० ते ५०० युनिट आहे, त्यात ४ पैसे वाढ झाली आहे.
सर्वसामान्यांना याचा कोणताही फटका बसणार नाही. उच्च वीज वापरकर्त्यांना याची झळ बसेल. शिवाय ही वाढ फार मोठी नाही.