वाढत्या उष्म्याने बदलली दिनचर्या

By admin | Published: March 4, 2017 01:20 AM2017-03-04T01:20:30+5:302017-03-04T01:20:30+5:30

मावळ तालुक्यातील वाढत्या उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Rising routine of rising heat | वाढत्या उष्म्याने बदलली दिनचर्या

वाढत्या उष्म्याने बदलली दिनचर्या

Next


कामशेत : मावळ तालुक्यातील वाढत्या उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे अनेकांच्या दिनचर्येत बदल झाला आहे.मार्च महिन्याच्या सुरवातीलाच दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. शहरातील रस्त्यावरही दुपारची वाहतूक कमी होत आहे. येथील हॉटेलांमध्ये चहाऐवजी शीतपेयांना मागणी वाढली आहे. ठिकठिकाणी रसवंतीगृहही सुरू करण्यात आली आहेत. तिथेही नागरिकांची गर्दी वाढत आहे. लिंबू सरबत, लस्सी व ताकालाही पसंती मिळत आहे. फळविक्रेत्यांनी फळांची आकर्षक मांडणी करून दुकाने थाटली आहेत. तिथेही वर्दळ वाढली आहे.
उन्हाच्या दाहकतेचा जनजीवनावर प्रभाव पडू लागला आहे. शेतकरी, व्यापारी, व ग्राहक सर्वांच्याच दिनचर्येत बदल झाले आहेत. दुपारच्या वेळी ग्रामीण भागातही शांतता दिसत आहे. तसेच जनावरांनाही सावलीच्या ठिकाणी बांधले जात आहे. काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उन्हाची तीव्रता अशीच राहिल्यास तालुक्यातील ठिकठिकाणी असलेले पाणीसाठे कमी होऊन काही गावांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत
आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे काही दिवसांपूर्वी कामशेत शहरात गरीबांचा फ्रीज अर्थात माठ राजस्थान, बिहार राज्यांमधूनमधून मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. विविध आकार, नळ नसलेले, नळ असलेले माठ मिळत आहेत. काळे व लाल रंगाचे माठ खरेदी करण्यासाठी सर्वसामान्य लोक गर्दी करीत आहेत.
राजस्थान उत्तर प्रदेश व बिहारचे व्यवसायिक डोक्यावर माठांची कामशेत व आजूबाजूच्या गावांमध्ये विक्री करताना दिसत आहेत. कामशेत ेमावळातील प्रमुख शहरांपैकी एक असल्याने येथे माठ आणून नंतर आजूबाजूंच्या गावात प्रवासी वाहनांनी नेऊन व डोक्यावर विक्री करताना परिसरात दिसत आहेत.
सर्वसामान्य माणसांना फ्रीज घेणे परवडणारे नसल्याने यांचा ओढा या माठाकडे आहे. शिवाय माठातील थंडगार पाणी प्यायल्यानंतर तहान भागते. फ्रीजमधील थंड पाण्याने तो अनुभव येत नसल्याने माठांना पसंती दिली जात आहे. वाढत्या गर्मीमुळे या माठ व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. हिवाळ्यात बंद असलेले पंखे, कुलर आता घरोघरी फिरू लागले आहेत. विजेचा वापर वाढला आहे. दुपारी गारवा मिळण्यासाठी नदीवर स्नानासाठी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. (वार्ताहर)
> शीतपेयांना मागणी : कलिंगडांची विक्री वाढली
हॉटेलमध्ये सॉफ्ट ड्रिंक्स, लस्सी, ताक, फळांचा रस, लिंबू आणि इतर सरबतांना मागणी वाढली आहे. भाजी विक्रेत्यांकडून कलिंगड, खरबूज, काकडी, कैऱ्या आदी फळे खरेदी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. उन्हाची तीव्रता डोळ्यांना कमी जाणवावी यासाठी दुचाकीस्वार गॉगल घालताना दिसत आहेत.

Web Title: Rising routine of rising heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.