मोदींंच्या ‘व्हिडीओ’ वरून उठले वादळ
By admin | Published: May 13, 2014 04:22 AM2014-05-13T04:22:31+5:302014-05-13T04:22:31+5:30
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिडीओ’वरुन नवीन वाद निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली : भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘व्हिडीओ’वरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. ऐन मतदानाच्या दिवशी प्रदर्शित करण्यात आलेल्या या ‘व्हिडीओ’त मोदी यांनी वाराणशीतील नागरिकांना एकता व बंधुतेच्या भावनेचे दर्शन करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. शिवाय वाराणशीतील गंगाजमुना संस्कृतीचीदेखील प्रशंसा केली. दरम्यान, कॉंग्रेसने मात्र या ‘व्हिडीओ’वर आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. वाराणशीतून निवडणूक लढणार्या मोदी यांनी या ‘व्हिडीओ’च्या माध्यमातून गंगा मातेचा आशीर्वाद मागितला आणि या पवित्र शहराच्या परंपरेला कायम ठेवण्याचे लक्ष्य असायला हवे. निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात नागरिकांनी उत्साह व एकात्मतेच्या भावनेने मतदान करावे. वाराणशीचा सन्मान शांती, बंधुता आणि एकतेतच आहे. यालाच गंगा-जमुना संस्कृती असे म्हटले जाते. हीच बाब मतदानातदेखील झळकली पाहिजे असे ते म्हणाले. कोट्यवधी लोक इतक्या भीषण गरमीतदेखील निवडणूकांत उत्साहाने सहभागी होत आहे याचे पाश्चिमात्य देशांना या गोष्टीचे विश्लेषण करायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘आप’ची निवडणूक आयोगावर टीका आम आदमी पक्षाने ‘व्हिडीओ’ दाखविणार्या वृत्तवाहिन्यांवर कडक ताशेरे ओढत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. ज्या वृत्तवाहिन्यांनी मोदी यांचा ‘व्हिडीओ’ प्रसारित केला त्यांच्यावर आयोगाने काहीच कारवाई केलेली नाही. आयोगाच्या या भुमिकेमुळे मोठा धक्का बसल्याचे मत ‘आप’तर्फे व्यक्त करण्यात आले आहे. ‘आप’ने देखील कॉंग्रेसची री ओढत निवडणूक आयोगाला पत्र लिहीले. संपूर्ण देशाला माहित आहे की मोदी हे वाराणशीतून निवडणूक लढत आहेत. ऐन मतदानाच्या दिवशी मोदी यांचे भाषण करणे हा मतदारांना प्रभावित करण्याचाच प्रकार आहे. या तक्रारीनंतर तरी निवडणूक आयोगाला जाग येईल आणि जनतेला तातडीची कारवाई पहायला मिळेल अशी टिप्पणी पत्रात करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता ही देशातील सर्व नागरिकांसाठी लागू असते. वृत्तवाहिन्या याला अपवाद नाहीत. निवडणूका स्वतंत्र व निष्पक्ष वातावरणात झाल्या पाहिजेत ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. परंतु उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना आयोगाने वृत्तवाहिन्यांवर कारवाईसाठी पुढाकार का घेतला नाही असा प्रश्न ‘आप’तर्फे उपस्थित करण्यात आला आहे.