महापालिकेचा रणसंग्राम, कोल्हापूर जोमात, कल्याण डोंबिवलीत वाढता प्रतिसाद
By admin | Published: November 1, 2015 08:42 AM2015-11-01T08:42:40+5:302015-11-01T13:29:10+5:30
सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेतील वाकयुद्धामुळे रंगलेल्या कल्याण डोंबिवली व कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली/कोल्हापूर, दि. १ - सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेतील वाकयुद्धामुळे रंगलेल्या कल्याण डोंबिवली व कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. कल्याण डोंबिवलीत ११.३० पर्यंत १८ टक्के तर कोल्हापूरमध्ये १२ पर्यंत ३० टक्के मतदान झाले आहे.
महापालिका निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेले वाकयुद्ध गाजले. वाघाचा पंजा, वाघाच्या तोंडातील दात, सरकार तडीपार करण्याचे इशारे अशा अनेक विधानांमुळे वातावरण चांगलेच तापले होते. राज ठाकरे यांनी नाशिकमधील विकास कामांचा हवाला देत मतदारांना साकडे घातले. कोल्हापूरमधील ८१ तर कल्याण डोंबिवलीतील १२२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. रविवारी सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात कल्याण - डोंबिवली आणि कोल्हापूरमध्ये मतदानाला सुरुवात झाली. कोल्हापूरमधील सदर बाजारमध्ये ताराराणीचे उमेदवार आणि अधिका-यांमध्ये वाद झाला होता. उमेदवाराचे प्रतिनिधी येण्यापूर्वीच मतदान यंत्र सुरु केल्याने ताराराणीचे कार्यकर्ते संतापले होते. तर डोंबिवलीतही भाजपा आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे वृत्त आहे.
कल्याण डोंबिवलीतील २७ गावांमध्येही मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भालेगावमधील ग्रामस्थांनी मात्र बहिष्काराचा पवित्रा कायम ठेवला आहे. मतदार याद्यांमधील घोळामुळे नाव शोधताना मतदारांची तारांबळ झाली आहे. कोल्हापूरमध्ये भाजपा - ताराराणीची युती असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तर कल्याण डोंबिवलीत भाजपा - आरपीआयची युती असून शिवसेना व मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व व काँग्रेसची आघाडीही निवडणुकीत कशी कामगिरी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.