धोका टळला; ४८ तास देखरेख

By admin | Published: October 5, 2015 02:43 AM2015-10-05T02:43:14+5:302015-10-05T02:43:14+5:30

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या जीवाचा धोका टळला असून, पुढील २४ ते ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून नंतर तिला इस्पितळातून सोडण्यात येईल

Risk avoidance; 48 hours Monitoring | धोका टळला; ४८ तास देखरेख

धोका टळला; ४८ तास देखरेख

Next

मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या जीवाचा धोका टळला असून, पुढील २४ ते ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून नंतर तिला इस्पितळातून सोडण्यात येईल, असे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
साधारणत: अडीच दिवस बेशुद्धावस्थेत असणारी इंद्राणी शनिवारी दुपारपासून उपचारांना प्रतिसाद देऊ लागली. हाक मारल्यावर, स्पर्श केल्यावर ती प्रतिसाद देत होती.
रविवारी सकाळी तिच्यात अधिक सुधारणा झाली आहे. ती शुद्धीत आली. सकाळी तिने पाणीही प्यायले. पण अजूनही थोड्या प्रमाणात ती झोपेच्या गुंगीत आहे, असे डॉ. लहाने म्हणाले.
दोन अहवालातील तफावतीबाबत विविध वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रविवारी डॉ. लहाने यांनी स्पष्टीकरण दिले. फॉरेन्सिक लॅबचा अहवालही विश्वसनीय आहे. हिंदुजा रुग्णालयात आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आलेल्या दोन्ही तपासण्या या वेगळ््या होत्या. हिंदुजा रुग्णालयात प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या होत्या. पण जीसीएमएस ही तपासणी फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आली. ही अंतिम तपासणी असते. या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
आत्महत्या की हत्येचा प्रयत्न? - विखे-पाटील
शीना बोरा हत्या प्रकरणातील संशयित आरोपी इंद्राणी मुखर्जीने आत्महत्येचा प्रयत्न केला की तिच्या हत्येचा प्रयत्न झाला, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. पत्रकारांशी बोलताना विखे-पाटील म्हणाले की, शीना बोरा हत्येचा तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली वेगाने तपास झाला होता. तरी देखील त्यांची अचानक बदली करून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.
आरोपींना अटक झालेली असताना आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असताना एखादे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे. कोणाला तरी वाचवण्याकरिता इंद्राणीची हत्या करण्याचा प्रयत्न झाला किंवा कसे अशी शंका सर्वसामान्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. कारागृहात असताना इंद्राणीची ही अवस्था होत असेल तर पानसरे यांच्या खुनातील आरोपी सनातनचा साधक समीर गायकवाडच्याही जीविताला धोका पोहचू शकतो, अशी शंका विखे-पाटील यांनी व्यक्त केली.
इद्राणीमध्ये आत्महत्येची प्रवृत्ती कधीच दिसून आली नव्हती. त्यामुळे कोठडीत अचानक बेशुद्ध होऊन ती निपचित पडली, यावरून काही तरी घातपात असावा, असा आम्हाला नक्कीच संशय येतो, असे इंद्राणीच्या वकील गुंजन मंगला यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
अ‍ॅड. मंगला म्हणाल्या की, आम्हाला इंद्राणीला भेटू दिले जात नसल्याने तिच्यावर योग्य उपचार झाले की नाही किंवा तिला कोणती औषधे दिली गेली, हे आम्हाला समजण्याचा काहीच मार्ग नाही. जे. जे. इस्पितळ तिच्या अवस्थेबद्दल न्यायालयात काय अंतिम अहवाल सादर करते याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. तो आल्यावर इंद्राणीला खासगी इस्पितळात हलविण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्याबाबत आम्ही विचार करू.

Web Title: Risk avoidance; 48 hours Monitoring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.