होल्डिंग पॉण्डमुळे पुराचा धोका
By admin | Published: July 10, 2017 03:12 AM2017-07-10T03:12:05+5:302017-07-10T03:12:05+5:30
अनेक वर्षे साफसफाई न झाल्याने शहरातील होल्डिंग पॉण्डमध्ये (धारण तलाव) बेसुमार खारफुटीची वाढ झाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अनेक वर्षे साफसफाई न झाल्याने शहरातील होल्डिंग पॉण्डमध्ये (धारण तलाव) बेसुमार खारफुटीची वाढ झाली आहे. तसेच त्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पावसाळ्यात या पॉण्डमुळे आजूबाजूच्या वसाहतींना पुराचा धोका निर्माण झाला आहे. गाळ उपासण्यास आणि खारफुटीची तोड करण्यास पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; परंतु कोणतीही कार्यवाही होत नसल्याने महापालिका प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली आहे.
नवी मुंबई शहराची भौगोलिक रचना ही किनारपट्टीपासून खाली आहे. त्यामुळे या शहराची निर्मिती करताना सिडकोने जगातील वेगवेगल्या शहरांचा अभ्यास केला. मुसळधार पावसात मुंबईप्रमाणे भरतीचे पाणी शहरात शिरू नये, यासाठी काय करता येईल याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. यानंतर हॉलंडच्या धर्तीवर नवी मुंबईतील खाडीकिनाऱ्याजवळ होल्डिंग पॉण्ड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पॉण्डच्या मुखावर मोठे दरवाजे उभे करण्यात आले. भरतीच्या काळात खाडीचे पाणी शहरात शिरणार नाही आणि पावसाचे पाणी या पॉण्डमध्ये जमा होईल, अशा पद्धतीने या दरवाजांची रचना करण्यात आली. ओहोटी सुरू होताच पॉण्डमध्ये जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढेल आणि दरवाजे आपोआप उघडून त्यातील पाणी खाडीत जाईल, अशी या पॉण्डची रचना करण्यात आली आहे. त्यामुळेच २६ जुलैच्या मुसळधार पावसातही होल्डिंग पॉण्डमुळे अवघ्या काही तासांत नवी मुंबईतील महत्त्वाच्या उपनगरांमधील पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे मुसळधार पावसातही मुंबई-ठाण्याप्रमाणे नवी मुंबईत सहसा पावसाचे पाणी तुंबून राहत नाही. असे असले तरी पॉण्डमधील खारफुटी व गाळ उपसला गेला नाही, तर भविष्यात याचा मोठा फटका शहराला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्यात भरतीरेषा तब्बल एक किलोमीटर आत शिरल्यामुळे पावसाच्या पुरापासून नवी मुंबईचा वर्षानुवर्षे बचाव करणारे होल्डिंग पॉण्ड आणि मोठे नाले किनारपट्टी नियंत्रण क्षेत्रात (सीआरझेड) समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे हे पॉण्ड व नाल्यांची देखभाल, दुरु स्तीच्या कामांना खोडा बसला आहे. या पॉण्डमध्ये खारफुटींची जंगले उभी राहिली आहेत. गाळाची पातळी वाढली आहे. शहरातील महत्त्वाच्या नाल्यांचाही ‘सीआरझेड’मध्ये समावेश झाल्याने त्यातील गाळ उपसणेही अशक्य झाले आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत असल्याने शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे.
दुर्गंधी व डासांचा उपद्रव : वाशी, ऐरोली, नेरु ळ व कोपरखैरणे आदीसह सिडकोने शहर वसविताना जवळपास ११ होल्डिंग पॉण्डची निर्मिती केली आहे. यातील बहुतांशी पॉण्डमध्ये अनियंत्रित खारफुटी वाढली आहे. नियमित देखभालीअभावी त्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे त्याची पाणी साठविण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे. अनेक वर्षे या पॉण्डमधील गाळ उपसला न गेल्याने त्यातून दुर्गंधी येत आहे. डासांचा उपद्रव वाढला आहे. त्याचा फटका परिसरातील नागरी वसाहतींना बसला आहे.