खाडीपट्ट्याला पुन्हा प्रदूषणाचा धोका
By Admin | Published: July 15, 2017 02:40 AM2017-07-15T02:40:46+5:302017-07-15T02:40:46+5:30
महाड औद्योगिक वसाहतीतून बाहेर टाकले जाणारे घातक रसायनयुक्त सांडपाणी सावित्री खाडीत योग्य प्रकारे मिसळले जावे
सिकंदर अनवारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीतून बाहेर टाकले जाणारे घातक रसायनयुक्त सांडपाणी सावित्री खाडीत योग्य प्रकारे मिसळले जावे, याचा दुष्परिणाम परिसरातील जनता आणि जलसृष्टीवर होऊ नये, याकरिता सुमारे सव्वादोन किलोमीटर खाडी पात्रात तळाशी पाइपलाइन टाकण्याचे काम ओवळे गाव हद्दीत सुरू आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी तयार केलेल्या आरसीसी ब्लॉकपासून ते ठेकेदाराने काढावयाच्या विविध परवानग्या, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे काम थांबविण्यात आले असले, तरी ठेकेदार औद्योगिक वसाहतीचे अधिकारी आणि त्यांच्या नोटिसांना जुमानत नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. ठेकेदारांच्या या मुजोरीमुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होत आहे. कालावधी काम पूर्ण करून अधिकारी, ठेकेदार येथून निघून जातील. मात्र, निकृष्ट कामामुळे प्रदूषणाच्या नरकयातना येथील स्थानिक नागरिकांना भोगाव्या लागतील. यासाठी वरिष्ठ कार्यालयाने अगर लोकप्रतिनिधींनी या कामात लक्ष घालण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होणारे टाकाऊ घातक रसायनयुक्त सांडपाणी सावित्री खाडीत ओवळे गावच्या हद्दीत सोडले जाते. सुरुवातीला पाणी एमआयडीसीमधील सुदर्शन कारखान्यासमोर नंतर तालुक्यातील सव आणि मुठवली दरम्यान सावित्री नदीपात्रात सोडले जात होते. प्रदूषणाचे विपरित परिणाम जसजसे समोर येऊ लागले, तसा स्थानिकांच्या विरोधाचा रेटा वाढू लागला. या दबावाखाली समुद्र जीव भूवैज्ञानिक (एनआयओ)ने सर्वेक्षण करून समुद्राच्या तोंडाशी म्हणजेच आंबेत खाडीत औद्योगिक वसाहतीत हे सांडपाणी सोडण्याचा निर्णय दिला. पाइपलाइनदेखील टाकली. आंबेत येथील स्थानिकांमुळे जनता आणि राजकीय दबावामुळे हे काम अपूर्ण राहिले. महाड औद्योगिक वसाहतीतील हे घातक रसायनयुक्त सांडपाणी ओवळे गावचे हद्दीत सोडण्यास प्रारंभ झाला. परिसरात कॅन्सर श्वसनाचे दुर्धर आजार, त्वचारोग आदींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. खाडीपट्ट्यातील नागरिकांच्या विरोधाचा रेटा दिवसेंदिवस वाढत असल्याने ओवळे गावचे हद्दीत खाडीकिनारी सोडण्यात येणारे हे घातक रसायनयुक्त सांडपाणी खोल खाडीच्या मध्यभागात सोडण्याचा निर्णय गतवर्षी घेण्यात आला. निविदा प्रक्रियेनंतर डिसेंबर २०१६मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली. मे आशा अंडरवॉटर सर्व्हिसेस प्रा. लि. या ठेकेदाराने हे काम हाती घेतले असून, सुरुवातीपासूनच हे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
औद्योगिक वसाहतीने काढलेल्या निविदेनुसार सांडपाणी वाहून नेणारी ही पाइपलाइन काँक्रीट ब्लॉकच्या मदतीने खाडीच्या मध्यभागी तळाशी खोदकाम करून टाकावयाची आहे. यासाठी ठेकेदाराने दोन वेगळ्या आकाराचे सिमेंट ब्लॉक तयार केले आहेत. हे ब्लॉक तयार करताना रेती, सिमेंट, खडीचा वापर केला जाणे गरजेचे आहे. मटेरियलचे डिझाइन गव्हर्मेंट पॉलिटेक्निक मुंबई यांच्याकडून एमआयडीसीने बनवून घेतला आहे. असे असतानादेखील वाळूऐवजी स्वस्तात मिळणाऱ्या ग्रीटचा वापर करीत ठेकेदाराने हजारो सिमेंटचे ब्लॉक तयार केले आहेत. रेतीऐवजी ग्रीटचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर देखिल एमआयडीसी अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे काम न थांबवून चुकीच्या कामाला पाठबळ दिले. चुकीच्या पद्धतीने तयार केलेले हे ब्लॉक पाइपलाइन सोबत खाडीतदेखील टाकण्यात आले. याकडे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
या खाडीच्या भागात वाळू उत्खनन आणि वाहतूक केली जाते. होड्या अगर वाळू उत्खनन करणारी सामुग्री यामुळे ही पाइपलाइन फसण्याची शक्यता आहे. तर केवळ खाडीच्या तळाशी खोदकाम न करता, ही पाइपलाइन टाकली तर ही वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठेके दारालाबजावली नोटीस
या कामाच्या टेंडर नोटीसमधील पान नंबर ३३ प्रमाणे या कामाची सुरुवात करताना निमसरकारी अगर सरकारी संस्थांच्या परवानग्या ना हरकत संबंधित ठेकेदाराने काढावयाच्या आहेत. कामास प्रारंभ केल्यानंतरदेखील संबंधित ठेकेदारांनी अशाच कोणत्या परवानग्या काढलेल्या नाहीत.
परवानग्या नसल्याबाबतचे पत्रदेखील एमआयडीसीने संबंधित ठेकेदाराला बजावले आहे. कामाच्या सुरुवातीलाच नोटीस लागून देखील १८ मे २०१७पर्यंत कोणतीही परवानगी अगर एनओसी संबंधित ठेकेदाराने काढली नाही. याप्रकरणी दुसरी नोटीसदेखील संबंधित ठेकेदाराला बजावली आहे. १४ जून रोजी तिसरी नोटीस काढून हे काम थांबवण्याच्या सूचना एमआयडीसीने संबंधित ठेकेदारास केल्या आहेत. मात्र, ठेके दार कोणालाही जुमानत नाही.
>माहिती अधिकाराचा दणका
गेले सहा महिने चुकीच्या प्रकारे असूनही पाइपलाइन टाकण्याचे हे काम अविरतपणे सुरू होते. रेतीच्या जागी ग्रीट वापरून ब्लॉक बनवले गेले, खोदकाम न करता, खाडीच्या तळाशी पाइपलाइन सोडली गेली. एमआयडीसीमार्फत तीन नोटिेसा बजावूनदेखील काम थांबले नाही. मात्र, १६ मे रोजी माहिती अधिकार टाकून २० जून रोजी माहिती प्राप्त केल्यानंतर हे काम थांबवण्यात आले.
>टेंडरमध्ये तरतुदीनुसार काम केले जाते, याबाहेर जर का काम केले जात असेल तर एमआयडीसी हे काम स्वीकारणार नाही. याबाबत
एक्झिके टिव्ह यांना सर्व अधिकार असतात. त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
- राजेश झंजाड,
अधीक्षक अभियंता,
एमआयडीसी आॅफिस पनवेल
>ब्लॉकमध्ये ग्रीटचा वापर
खाडीत औद्योगिक वसाहतीतील घातक रसायन सांडपाणी टाकण्याचे हे काम ११ कोटी, ६९ लाख रुपयांचे आहे. पैकी २१.१० टक्के बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. गव्हर्मेंट पॉलिटेक्निक मुंबई बांद्रा पूर्वमार्फत या कामासाठी आवश्यक सिमेंट आणि २० एमएम खडी आणि नदीची वाळू असा एम ३५ हे मिक्स डिझाइन बनवून दिले.
त्यांनी दिलेल्या या डिझाइनला फाटा मारत, नदीतील वाळूऐवजी थेट ग्रीट वापरण्याचा पराक्रम ठेकेदाराने केला आहे. ब्लॉक बनवताना ग्रीटचा वापर केल्याचे चौकशीअंती समोर आल्याचे उत्तर एमआयडीसीकडून देण्यात आले आहे.
एमआयडीसीने तयार केलेल्या अंदाजपत्रकातील पान नंबर १३ प्रमाणे पाइपलाइन टाकताना खाडीच्या तळाशी खोदकाम करावयाचे आहे. यावर सुमारे सव्वादोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, खोदकाम न करता केवळ पाइपलाइन टाकण्याचे काम सुरुवातीलाच करण्यात आले. खाडी तळाशी असली तरी हि पाइपलाइन खोदकाम न करता टाकण्यास पाण्याचा प्रवाह आणि दाब यामुळे पाइपलाइन वाहून जाण्याची दाट शक्यता आहे.