दरड कोसळण्याचा धोका !
By admin | Published: August 5, 2014 01:05 AM2014-08-05T01:05:26+5:302014-08-05T01:05:26+5:30
रामदेवबाबा टेकडी परिसर शहरातील एक सुंदर परिसर म्हणून ओळखला जातो. किमान दीडशे फुट उंच असलेली ही टेकडी (पहाड) विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. यावर एक अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.
कुतुबशहानगरही संकटात : प्रशासन लक्ष घालणार का ?
नागपूर: रामदेवबाबा टेकडी परिसर शहरातील एक सुंदर परिसर म्हणून ओळखला जातो. किमान दीडशे फुट उंच असलेली ही टेकडी (पहाड) विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. यावर एक अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. तसेच रामदेवबाबांचे सुंदर मंदिरसुद्धा आहे. शहरातील एक पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा ही टेकडी ओळखली जाते. या टेकडीच्या आजूबाजूला वस्त्या वसल्या आहेत. अगदी समोरच्या बाजूला पोलीस लाईन टाकळी, गिट्टीखदान पोलीस ठाणे, तसेच मागच्या बाजूला भूपेशनगर,अनंतनगर या वस्त्या आहेत. परंतु या टेकडीपासून लांब आहेत. मात्र या टेकडीला लागून गिट्टीखदान परिसरातील कुतुबशहानगर आणि दशरथनगर हा झोपडपट्टीचा परिसर वसला असून तो सर्वाधिक धोकादायक आहे. कारण या दोन्ही वस्त्या थेट पहाडाला लागून असून वरून दगड-धोंडे कोसळूून पडणे ही रोजचीच बाब झाली आहे. लोकांच्या घरांवर दगड पडल्याने अनेक अपघातही झाले आहेत. पावसाळ्यात हे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात येथील नागरिक सर्वाधिक दहशतीत असतात. माळीणची घटना घडल्यानंतर आमच्या चमूने या वस्त्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
गरिबी व नाईलाजास्तव लोकांनी येथे घरे थाटली आहेत. परंतु पावसाळ्यात कधी कुठून दरड किंवा दगड कोसळून पडेल याचा नेम नाही, त्यामुळे येथील नागरिक आपला जीव मुठीत घेऊनच जगत आहेत. त्यामुळे माळीणसारखी घटना येथे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. माळीणची घटना घडली तेव्हा ती रोखता येईल यासाठी प्रशासनाला वेळही मिळाला नाही. तेव्हा तीच पुनरावृत्ती नागपुरात होऊ नये, या उद्देशाने शासन व प्रशासनाला यातून काही उपायाजना करता याव्यात, म्हणून या वस्त्यांकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे.