लातूरच्या ‘जलयुक्त’ चळवळीचे रितेश देशमुख ब्रँड अॅम्बेसेडर
By admin | Published: April 24, 2016 02:26 AM2016-04-24T02:26:11+5:302016-04-24T02:26:11+5:30
सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी लातूरच्या पाणीटंचाईसाठी सुरू असलेल्या जलयुक्त चळवळीच्या कामांसाठी २५ लाख रुपयांचा धनादेश शनिवारी जलयुक्तच्या व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला.
लातूर : सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी लातूरच्या पाणीटंचाईसाठी सुरू असलेल्या जलयुक्त चळवळीच्या कामांसाठी २५ लाख रुपयांचा धनादेश शनिवारी जलयुक्तच्या व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केला. या वेळी समितीचे मार्गदर्शक डॉ. अशोक कुकडे यांनी रितेश देशमुख यांची जलयुक्त लातूरच्या चळवळीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा केली.
लातूरच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जलयुक्त चळवळ चांगल्या प्रकारे काम करीत आहे. लोकसहभागातून निधी उपलब्ध करून कामे केली जात आहेत. याबाबत सोशल मीडिया आणि विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वाचून आपणही या चळवळीत सहभागी व्हावे, या उद्देशाने लातुरात येऊन मांजरा नदीवरील साई बंधाऱ्यात चालू असलेल्या कामाची शनिवारी सकाळी पाहणी केली, तसेच जलयुक्त चळवळीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारण्याचा संकल्प करून लातूरचा भूमिपुत्र असल्यामुळे योगदान देत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)