रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला १५ दिवसांत भूखंड कसा दिला?; भाजपाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 05:44 PM2022-10-19T17:44:15+5:302022-10-19T19:00:26+5:30
Riteish Deshmukh: रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची भागीदारी असलेल्या कंपनीला लातूर एमआयडीसीमध्ये देण्यात आलेला भूखंड आणि कर्जावरून भाजपाने त्यांच्यावर हे आरोप केले आहेत.
मुंबई - अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या कंपनीला मिळालेल्या भूखंडावरून भाजपाने गंभीर आरोप केले आहेत. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची भागीदारी असलेल्या कंपनीला लातूर एमआयडीसीमध्ये देण्यात आलेला भूखंड आणि कर्जावरून भाजपाने एमआयडीसीवर हे आरोप केले आहेत.
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची भागीदारी असलेल्या मे. देश अँग्रो प्रा.लि. कंपनीवर भाजपाकडून हे आरोप करण्यात आले आहेत. या कंपनीला लातूर एमआयडीसीमध्ये प्रतीक्षा यादीत असलेल्या १६ उद्योजकांना डावलून भूखंड देण्यात आला. तसेच लातूर जिल्हा बँकेकडून ११६ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले, असे आरोप भाजपाकडून करण्यात आले आहेत. दरम्यान, भाजपाकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबत रितेश आणि जेनेलिया देशमुख तसेच इतर देशमुख कुटुंबीयांकडून कुठलीली प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
याबाबत भाजपाचे लातूर शहरप्रमुख गुरुनाथ मगे यांनी सांगितले की, जेव्हा त्या १६ लोकांपैकी काही जण मला भेटले. आता भाजपाची सत्ता आली आहे. आमच्यावर अन्याय झाला आहे. त्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे, असा प्रश्न त्यांनी केला. त्यानंतर आम्ही माहिती मिळवली. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती आम्ही लोकांसमोर मांडत आहोत. या १६ जणांना डावलून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना भूखंड देण्यात आला. सत्तेचा गैरवापर करून त्यांनी भूखंड मिळवला आहे, असा माझा आरोप आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांकडे आम्ही तक्रार करणार आहोत, असा आरोप केला आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार मे. देशो अँग्रो प्रा.लि. कंपनीची स्थापना २३ मार्च २०२१ रोजी झाली होती. या कंपनीमध्ये रितेश आणि जेनेलिया यांची ५० टक्के भागीदारी आहे. दरम्यान, या कंपनीकडे साडे सात कोटी रुपयांचे भाग भांडवल आहे. या कंपनीने ५ एप्रिल २०२१ रोजी भूखंडासाठी एमआयडीसीकडे अर्ज केला होता. त्याला १५ एप्रिल २०२१ रोजी मंजुरी देण्यात आली. दरम्यान, एवढ्या जलद पद्धतीने प्रतीक्षा यादीतील १६ जणांना डावलून भूखंड कसा काय देण्यात आला असा आरोप भाजपाने केला आहे. तसेच लातूर जिल्ह्या बँकेत कर्जासाठी अर्ज केल्यावर तब्बल ११६ कोटी रुपयांचे कर्जही देण्यात आले, असा आरोपही भाजपाने केला आहे. या प्रकरणी रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर या प्रकरणात स्पष्टता येण्याची शक्यता आहे.