विधी विद्यापीठ जागा बदलण्याच्या तयारीत
By Admin | Published: May 1, 2017 07:34 PM2017-05-01T19:34:12+5:302017-05-01T19:34:12+5:30
शासकीय महाविद्यालयात स्थापन झालेले महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ जागा बदलण्याच्या तयारीत आहे.
राम शिनगारे/ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 1 - शासकीय महाविद्यालयात स्थापन झालेले महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ जागा बदलण्याच्या तयारीत आहे. यासाठी मृदा आणि जल व्यवस्थापन संस्था (वाल्मी) आणि याच संस्थेला लागून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या निवास्थानाची पाहणी कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांच्यासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. यासह इतरही ठिकाणच्या जागेचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद शहरात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना होण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागली. मात्र सात वर्ष केवळ घोषणांवर बोळवण होत होती. याउलट नागपूर, मुंबई येथील विधी विद्यापीठाला सुरुवात झाली. यानंतर औरंगाबादेत विधी विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचाली सुुरू झाल्या. यात कुलगुरूपदी डॉ. एस. सूर्यप्रकाश यांची नेमणूक करत महत्वाचे पाऊल उचलले. याचवेळी विधी विद्यापीठाच्या करोडी परिसरातील जागेवर बांधकाम होईपर्यंत शासकीय अध्यापक महाविद्यालयात विधी विद्यापीठ सुरू करण्यात आले.
या महाविद्यालयात काही सुविधा निर्माण करण्यासाठी निधीही देण्यात आला. मात्र विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी विविध शैक्षणिक ठिकाणांच्या जागांची चाचपणी सुरू केली आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत वाल्मीसह इतर ठिकाणच्या जागेची पाहणी केली आहे. आगामी तीन वर्षांत विद्यार्थ्यांना पुरतील एवढ्या वर्ग खोल्या आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा असणाऱ्या ठिकाणाला प्राधान्य देण्यात येत आहे. यादृष्टीने तयारी करण्यात येत असून, लवकरच जागा बदलण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे समजते.
- शासकीय अध्यापक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासंदर्भात काही आडचणी निर्माण होत आहेत. यामुळे क्लास रुम आणि वसतीगृहाची सुविधा असणाऱ्या जागेची पाहणी करण्यात येत आहे. मात्र विद्यापीठाचे कार्यालय शासकीय अध्यापक महाविद्यालयातच राहील. केवळ विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. अद्याप कोणत्याही जागेची निवड केलेली नाही. जागा निवडल्यास कळविण्यात येईल.
- डॉ. एस. सूर्यप्रकाश, कुलगुरू
- विधी विद्यापीठाचे कुलगुरू आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाल्मीमध्ये क्लासरूमची पाहणी केली. मात्र आमच्याकडे वसतीगृहाची सुविधा उपलब्ध नाही. दोन-तीन वर्षांसाठी क्लासरूमची मागणी करण्यात आली, तर संस्था नक्कीच सकारात्मक विचार करेल.
- एच. के. गोसावी, महासंचालक, वाल्मी