जिल्ह्यातील नदी,नाले भरले

By Admin | Published: September 7, 2014 12:13 AM2014-09-07T00:13:45+5:302014-09-07T00:29:36+5:30

लोहा/किनवट/माहूर/बिलोली/ हिमायतनगर : माहूर, किनवट आणि किनवट तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे.

The rivers in the district, filled with drains | जिल्ह्यातील नदी,नाले भरले

जिल्ह्यातील नदी,नाले भरले

googlenewsNext

लोहा/किनवट/माहूर/बिलोली/ हिमायतनगर : माहूर, किनवट आणि किनवट तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. किनवट तालुक्यात १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत ५४ मि. मी. पावसाची नोंद झाली तर पावसामुळे श्रीक्षेत्र माहुरातील कार्यालयांना गळती लागली तर जुन्या लोह्यातून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने लोह्यातील आंबेडकरनगरात पाणी शिरले.
किनवट: पावसामुळे काहीअंशी पिकांना जीवदान मिळणार असले तरी पडणाऱ्या भविष्यातील टंचाई उद्भवू नये म्हणून मदत होणार आहे़ पावसामुळे बळीराजा सुखावला आहे़ पाऊस जरी बरसत असला तरी पिकांची आणेवारी मात्र घटणारच असल्याने शासनाने तालुक्यातील ४८ हजार शेतकऱ्यांना सरसकट मदत करून धीर देण्याची मागणी आहे़ शुक्रवारपर्यंत जेमतेम जलसाठा असलेल्या काही प्रकल्पात पाणीसाठा वाढला तर सिरपूर व मांडवी हे दोन प्रकल्प ओव्हरफूल होण्याच्या मार्गावर आहेत़ तालुक्यात आतापर्यंत ४३४ मि़ मी़ इतका पाऊस पडला.
पैनगंगा नदीसह सर्वच नाल्यात पाणी
श्रीक्षेत्र माहूर: श्रीक्षेत्र माहूर शहरासह तालुकाभरात समाधानकारक पाऊस सुरू असल्याने पैनगंगा नदीसह सर्वच नाल्यात पाणी वाहू लागले़
शहरात ३१ आॅगस्ट रोजी ३० मि़ मी़ पाऊस झाला़ तर आजपर्यंत शहरासह तालुक्यातील वानोळा, वाईबाजार, सिंदखेड, माहूर या सर्कलमध्ये एकूण ४५९़१२ मि़ मी़ पाऊस झाल्याने तालुक्यातील ३४ हजार ४०० हेक्टर पेरणीलायक शेती क्षेत्रापैकी एकूण ३३ हजार ६०० हेक्टर ९६ टक्के शेतीक्षेत्रात झालेली पेरणी समाधानकारकरित्या उगवली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व्ही़ आऱ चन्ना यांनी दिली़
शहरातील नगरपंचायत, पोलिस ठाणे, सा़बां़विभाग कार्यालयासह विश्रामगृह निवासस्थाने ग्रामीण रुग्णालय तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, कर्मचारी निवासस्थाने, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, वनपरिक्षेत्र कार्यालय, निवासस्थाने, तहसील कार्यालयासह याच प्रशासकीय इमारतीत असलेले पंचायत समिती कार्यालय, दुय्यम निबंधक, भूमीअभिलेख, उपकोषागार कार्यालया यासह मराविम, बीएसएनएल, कृउबास, आश्रमशाळासह सर्वच शासकीय कार्यालये रिमझिम तथा मुरवणी पाणी पडत असल्याने गळत असून अनेक जुनाट कार्यालये व निवासस्थाने धोकादायक स्थितीत आहेत़
माहूरच्या पोलिस ठाण्याची इमारत व निवासस्थाने सन १९५८ साली बांधलेली असून पोलिस ठाण्याच्या आवारात ३६ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी १६ निवासस्थाने बांधलेली असून या सर्व निवासस्थानाच्या छत व भिंतीतून पाणी पडत असल्याने छताला पॉलिथीन बांधून पोलिसांना दिवस-रात्र जागून काढावे लागत आहे.
बिलोलीत सतत दोन दिवस पाऊस
बिलोली : मागच्या दोन दिवसांत ५० मि़ मी़ पाऊस झाला़ नाले, तलाव आदीमध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी दिसून येत आहे़ लातूर, बीड जिल्ह्यात मोठा पाऊस झाल्याने सीमावर्ती मांजरा नदीत पाणी वाहतांना दिसत आहे़ तालुक्यातील कुंडलवाडी, सगरोळी, लोहगाव, आदमपूर, रामतीर्थ सर्कलमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला़
हिमायतनगर: रिमझिम पाऊस
हिमायतनगर : तालुक्यात पोळा सणापासून रिमझिम पावसाच्या सरी पडल्याने पिकापुरता पाऊस झाला़ परंतु ३०, ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर या तीन दिवसात थोडा-थोडा खंड देवून पाऊस चालू असून नदी, नाले पहिल्यांदाच वाहिले़ जमिनीत भरपूर ओलावा झाला असून शेतकरी आनंदीत आहेत़
गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही़ ग्रामीण भागात व गल्लीत चिखल झाला़ शेतातील वखर, फवारणी, खत टाकणे, निंदणे आदी कामे बंद आहेत़ शेतात जनावरांना अजून बऱ्यापैकी चारा झाला नाही़ अनेक शेतकऱ्यांनी औत मोडले़ दुभती जनावरेही कमी झाली़ यांत्रिक शेती शेतकरी करीत आहेत़ नागरणे, फणने, पेरणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करीत आहेत़ (वार्ताहर)
मानार प्रकल्पात पाणीसाठा वाढला
बारूळ : येथील मानार जलाशय हे कंधार, नायगाव, बिलोली, मुखेडसह परिसरातील तालुक्याची कामधेनू असून दोन ते तीन दिवासांच्या मुसळधार पावसाने प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली़ प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा झाला़ बारूळ मानार प्रकल्पात २६ आॅगस्टपर्यंत १६ टक्के साठा होता़ पण पोळा झाल्यानंतर पावसाचा जोर वाढून येत्या २४ तासात ५४ मि़मी़ पाऊस पडल्याने प्रकल्पात वाढ झाली असून सध्या प्रकल्पात ३२९़७ पाणीपातळी असून प्रकल्पात सध्या २० टक्के साठा आहे़ या प्रकल्पामुळे २२ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. शेतकऱ्याजवळील कडबा चारा संपल्याने शेतकरी चिंतेत होता़ काही शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून २ हजार टन प्रमाणे किंवा १२०० सरीप्रमाणे ऊस आणून आपल्या पशूला चारा म्हणून टाकत होते़ मत्स्य व्यवसाय करणारे भोई समाज स्थलांतर करीत होते़ पावसामुळे काही दिवसापुरता का असेना चाऱ्याचा प्रश्न मिटला आहे़ भोई समाजाला प्रकल्प भरेल का अशी आशा वाटत आहे़

Web Title: The rivers in the district, filled with drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.