रिझवान अल्पवयीन असल्याचा वकिलांचा दावा
By admin | Published: January 31, 2016 02:08 AM2016-01-31T02:08:05+5:302016-01-31T02:08:05+5:30
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उत्तर प्रदेशात अटक केलेला रिझवान ऊर्फ नवाजुद्दीन हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे. त्यानंतर न्यायालयाने रिझवानला
-डिप्पी वांकाणी, मुंबई
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उत्तर प्रदेशात अटक केलेला रिझवान ऊर्फ नवाजुद्दीन हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे. त्यानंतर न्यायालयाने रिझवानला ११ फेब्रुवारीपर्यंत कोठडी देताना त्याची रवानगी डोंगरी येथील निरीक्षण केंद्रात केली. मालवणी परिसरातील युवकांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढल्याच्या आरोपाखाली रिझवानला एटीएसने अटक केली.
रिझवानच्या वकिलाने त्याचा शाळेचा दाखला न्यायालयात सादर करून तो केवळ १६ वर्षांचा असल्याचा दावा केला, तर एटीएसने रिझवान सज्ञान असल्याचे सांगितले. रिझवानच्या बचावासाठी दाखविण्यात आलेली शालेय प्रमाणपत्रे त्याच्या पालकांनी बेकायदेशीररीत्या मिळवली असून, त्याच्या निवडणूक ओळखपत्रावर तो २२ वर्षांचा असल्याचे नमूद केले आहे, असे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.
दहावीच्या परीक्षेत दोनदा नापास झाल्यानंतर रिझवानच्या वडिलांनी बनावट प्रमाणपत्रे मिळवली होती. रिझवानने चौकशीत तो १९ वर्षांचा असल्याचे सांगितले होते, तर मतदान ओळखपत्रावरून तो २२ वर्षांचा असल्याचे दिसते. तो सज्ञान असल्याचे सिद्ध करण्यासाठी मूळ कागदपत्रे मिळविण्याचे निर्देश आम्हाला प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर बाल गुन्हेगारविषयक कायद्यातील बदलानुसार तो १६ वर्षांचा असला तरी त्याच्याशी सज्ञान म्हणूनच व्यवहार केला जाईल, असे एटीएसमधील एका वरिष्ठ सूत्राने सांगितले.
राष्ट्रीय तपासी संस्था (एनआयए) आणि एटीएसने संयुक्त मोहीम राबवून रिझवानला अटक केली होती. थेट परदेशी सूत्रधाराच्या निर्देशावरून मुंबईतील तरुणांना कट्टरवादी बनवून संघटनेत सामील करून घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील या युवकांवर प्रभाव टाकण्यासाठी रिझवानने किमान दोन वेळा मुंबईला भेट दिली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे.