नोटरीसाठी रिझवानचे ‘किल्ला कोर्ट कनेक्शन’ आले समोर
By admin | Published: July 27, 2016 02:47 AM2016-07-27T02:47:27+5:302016-07-27T02:47:27+5:30
एटीएसने ताब्यात घेतलेल्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या अर्शीद कुरेशीच्या चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील तरुण-तरुणींच्या धर्मांतरासाठी कुरेशीचे दक्षिण मुंबईतून
- मनीषा म्हात्रे, मुंबई
एटीएसने ताब्यात घेतलेल्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या अर्शीद कुरेशीच्या चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील तरुण-तरुणींच्या धर्मांतरासाठी कुरेशीचे दक्षिण मुंबईतून रजिस्टे्रशन सुरू होते. यासाठी त्याने तेथील एका मशिदीचा आसरा घेतला होता. शिवाय कल्याण येथून अटक केलेल्या रिझवानने या धर्मांतर झालेल्यांच्या नोटरीसाठी किल्ला कोर्टाबाहेरील कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतले होते. त्यामुळे किल्ला कोर्टासह दक्षिण मुंबईतील संपूर्ण परिसरावर एटीएसचा वॉच आहे.
राज्य दहशतवादविरोधी पथकाने गेल्या १० वर्षांत धर्मांतर केलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आतापर्यंत जवळपास अडीच हजाराहून अधिक जणांनी धर्मांतर केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्यामध्ये मुंबईतील ३०० जणांचे धर्मांतर झाले असल्याचे समजते. त्यामुळे एटीएसने या सर्वांना विश्वासात घेऊन अधिक शोध सुरू केला आहे. या सर्वांचा धर्मांतराचा मार्ग कुणामुळे मोकळा झाला आणि कसा याबाबत एटीएसकडून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. कुरेशी या तरुण-तरुणींना नवीन मुंबईतील त्याच्या कार्यालयात नेऊन तेथे त्यांना धर्मांतराचे धडे देत असे. धर्मांतराबाबत अधिक माहिती देण्यासाठी तो त्यांना डोंगरी येथील इस्लामिक रिसर्च फाउंडेशनच्या कार्यालयात आणत असे. त्याचदरम्यान येथील एका मशिदीमध्ये या तरुण-तरुणींच्या धर्मांतराचे रजिस्टे्रशन केले जात असल्याचे त्याच्या चौकशीत समोर आले. या प्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
त्यानंतर कल्याणच्या रिझवानवर त्यांच्या नोटरीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. रिझवानला अटक केल्यानंतर त्याने किल्ला कोर्ट परिसरातून नोटरी केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एटीएसने तेथील नोटरी करून देणाऱ्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. दोघांच्या चौकशीत मोठे जाळे उघड होण्याची शक्यता एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली आहे.