मुरुड तालुक्यातील रस्त्यांची चाळण
By admin | Published: July 22, 2016 02:11 AM2016-07-22T02:11:25+5:302016-07-22T02:11:25+5:30
अलिबाग, रेवदंडा आणि मुरु डमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली
बोर्ली-मांडला/मुरुड : अलिबाग, रेवदंडा आणि मुरु डमधील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरु ड या दोन तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्याऐवजी खड्ड्यातून मार्ग काढण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. ५० किमीच्या प्रवासासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागत असल्याने प्रवशांचे हाल होत आहेत.
अलिबाग ते मुरु ड या रस्त्यासाठी कोट्यवधी रु पयांचा निधी खर्च करूनसुद्धा हा निधी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जात आहे. अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा परिषद आदी अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच महाविद्यालये आहेत. या ठिकाणी विविध कामांसाठी जिल्हाभरातील नागरिक येत असतात. मुरु ड चणेरा येथील नागरिक रेवदंडा मार्गे अलिबाग असा प्रवास करून ये -जा करतात. पावसाळ्यापूर्वी दोन महिन्ने आधी या रस्त्यावर ठिकठिकाणी डांबर व खडीने खड्डे भरून त्याची मलमपट्टी करण्यात आली, मात्र जून महिन्यात वरुणराजाचे आगमन होताच रस्त्यावर पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे सर्वत्र खड्डे पडले आहेत. पावसामुळे आणि अवजड वाहतुकीमुळे लहान लहान खड्डे मोठे झाले असून यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
>खड्यांमुळे वाढले अपघात
अलिबाग ते रेवदंडा या रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना गणपती सणापूर्वी
दुरु स्ती तसेच आॅक्टोबर महिन्यापूर्वी रस्त्याचे नव्याने बांधकाम करण्यास सुरु वात करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने हात झटकल्याने पावसात या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
>नागोठणे - पोयनाड रस्त्याची दैना
नागोठणे : पोयनाडमार्गे अलिबागकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. या मार्गात नागोठणे ते शिहू दरम्यान जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव मेटाकुटीस आला आहे. या परिसरात रिलायन्सचा कारखाना असल्याने शेकडो वाहनांची दररोज वर्दळ असते. नागोठणे - शिहू दरम्यान सहा आसनी मिनीडोर सुरू असतात. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
दोन - चार दिवसांनी रिक्षाची दुरु स्ती करावी लागत असल्याने, आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे मिनीडोर चालक जयराम खाडे यांनी सांगितले. पावसाळ्याच्या तोंडावर काही भागाचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र पावसामुळे पुन्हा खड्डे पडले आहेत. पावसाळा चालू झाल्यानंतर लगेचच हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. यामुळे नागरिकांसह प्रवासी हैराण झाले आहेत. वाहनचालकांना येथून जाताना कसरत करावी लागत आहे, यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.