लोणावळ्यातील कोंडी सोडविण्यासाठी रस्ता
By admin | Published: May 17, 2016 02:30 AM2016-05-17T02:30:46+5:302016-05-17T02:30:46+5:30
लोणावळ्यातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी खालापूर ते सिंहगड महाविद्यालयापर्यंत नवीन रस्ता तयार करण्यात येणार
पिंपरी: पुणे-मुंबई महामार्गावरील लोणावळा खंडाळा घाटात होणारी वाहतूककोंडी, लोणावळ्यातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी खालापूर ते सिंहगड महाविद्यालयापर्यंत नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे पाचशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे, लोणावळा ते पुणे लोहमार्गाच्या तिसऱ्या लेनलाही केंद्राने हिरवा कंदिल दाखविला आहे, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोणावळ्यातील वाहतूक प्रश्न आणि रेल्वेच्या प्रश्नांबाबत ‘लोकमत’ने आता बास उपक्रमातून आवाज उठविला होता. त्यानुसार खासदार बारणे यांनी संसदेतही याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. पाठपुराव्याने वाहतूक आणि रेल्वेचा प्रश्न सुटला आहे. या विषयी खासदार बारणे म्हणाले, ‘‘रेल्वेचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. तिसऱ्या ट्रॅकला मान्यता मिळाली आहे. त्यासाठी सुमारे आठशे कोटींशी तरतूद केली आहे.’’
लोणावळा-खंडाळ्यातून मुंबईला जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. त्यामुळे घाटात अडथळा निर्माण झाल्यास तासन्तास वाहतूककोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना अडकून पडावे लागत होते. ही वाहतूककोंडी सोडविण्यासाठी खालापूर ते सिंहगड महाविद्यालय या रस्त्यास मंजुरी मिळाली आहे.
निविदाप्रक्रिया होऊन हे काम लवकरच सुरू होईल. त्यामुळे कोंडी कमी होणार आहे. बोपखेल आणि पिंपळे सौदागर रस्त्याबाबतही संरक्षणमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखविला आहे.’’
(वार्ताहर)