कसारा: ग्रामसडक योजनेचे भर पावसात सुरु, रस्त्याच्या कामासाठी बालमजुरांचा वापर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 05:13 PM2021-06-14T17:13:33+5:302021-06-14T17:14:07+5:30

लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षमुळे चांगल्या योजनांना हरताळ फासल्याचे चित्र सद्या शहापूर तालुक्यातील आदिवासी गांव पाड्यात पाहवयास मिळत आहे.

road construction work started in heavy rain in kasara area in cm gram sadak yojana | कसारा: ग्रामसडक योजनेचे भर पावसात सुरु, रस्त्याच्या कामासाठी बालमजुरांचा वापर!

कसारा: ग्रामसडक योजनेचे भर पावसात सुरु, रस्त्याच्या कामासाठी बालमजुरांचा वापर!

Next

- शाम धुमाळ

कसारा: विकासापासून दूर असलेल्या आदिवासी पाड्यांची प्रगती व्हावी म्हणून प्रथम दळणवळणाची सोय उत्तम दर्जाची करण्याचा मानस शासनाचा असून त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची सुरुवात करण्यात आली यामुळे गाव-पाड्यात दळणवळणाची सुविधा होईल व  या मागास भागाचा शहरी परिसराशी संपर्क येऊन या गाव-पाड्यांचा  विकास होईल या उद्दात्त हेतूने शासनाने सुरू केलेल्या या योजनेला काही भ्रष्ट ठेकेदार व प्राशसनातील अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षमुळे चांगल्या योजनांना हरताळ फासल्याचे चित्र सद्या शहापूर तालुक्यातील आदिवासी गांव पाड्यात पाहवयास मिळत आहे.

शहापूर तालुक्यातील अजनुप परिसरातील दहा आदिवासी पाड्यांना जोडणारा प्र.जि. मा. 51 ते भाकरीपाडा(उठावा) रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी देण्यात आली. सदर रस्त्याच्या कामाचा ठेका मे.आर. के. सावंत कंट्रक्शन, नाशिक या कंपनीला देण्यात आला. सदर ठेकेदाराने 28 नोव्हेंबर 2018 मध्ये कामास सुरुवात केली. सुरुवातीला फक्त 15 दिवस काम करून सदर काम बंद करण्यात आले, या रस्त्याचा काम पूर्ण करण्याचा कालावधी हा 9 महिन्यांचा होता परंतु आता पर्यंत 2 वर्ष  उलटून गेले तरी हे काम बंद होते.

येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देऊनही या कामाला सुरुवात होत नसल्याने आंदोलनाचा इशारा देताच ठेकेदाराने काम सुरु केले. परंतु रस्त्याची कामे 30 मे नंतर बंद केली जातात. मात्र या ठेकेदाराने भर पावसात हे कामे सुरु केलीत , या कामाचे स्वरूप रस्त्याची  लांबी 6.450 किलो मीटर आहे यात 11 मोऱ्या, 900 मीटर काँक्रीटीकरन  रस्ता, 5.550 किलो मीटर डांबरीकरण रस्त्याचा समावेश आहे. यात 75 मी.मी. खडीचा थर देऊन पाणी मिश्रित दबाई करणे, एम. पी.एम. चा थर 50 मी.मी. तसेच कारपेट, सिलकोट, 20 मी.मी. यानुसार काम करावयाचे असून यातील अंदाज पत्रकानुसार कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही आणि जे काम केले, तेदेखील अतिशय निकृष्ट दर्जाचे. शिवाय ठिकठिकाणी मोऱ्या खोदून ठेवल्याने रस्ता देखील बंद होण्याच्या मार्गांवर आहेच. यामुळे अजनुप, वारलीपाडा, कोळीपाडा, भाकरेपाडा, मेंगाळपाडा, कटीचापाडा, वारेपाडा, बोंडारपाडा, भस्मेपाडा, उठावा, येथील आदिवासी ग्रामस्थांना माळरानातून वाट काढत रोज  बाजारपेठ तसंच आपला पाडा गाठावा लागत आहे. एखाद्या आजारी रुग्णास डोली करून आणावे लागते.

दरम्यान कामात दिरंगाई करणाऱ्या या ठेकेदारकडून अनेक काम निकृष्ट दर्जाची केली जातात  व वेळेत करीत नसताना सरकारी बाबू यांच्यावर का मेहेरबान असतात हा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण परिस्थितिला ठेकेदार व  प्रशासकीय अधिकारी यांची असलेली अभद्र युती व स्थानिक आजी माजी  लोकप्रतिनिधी यांनी केलेले दुर्लक्षच कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया येथील आदिवासी ग्रामस्थांची आहे.

ठेकेदाराची चालबाजी

दरम्यान संबंधित रस्ता तयार करणारा ठेकेदार दोन अडीच वर्षापासून दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरु करतो व थोडे फार बेगडी काम करून बिल काढण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे या वर्षी देखील 10 आदिवासी गांव पाड्यांना डांबरी रस्त्या पासून वंचित राहून जीवघेण्या समस्यांना तोड द्यावे लागणार आहे.

सद्या सुरु असलेल्या कामात बालमजूर!

दुसरीकडे, भर पावसात सुरू असलेल्या रस्ता कामात मजुरी वाचवण्यासाठी आर. के. सावंत कंपनी चा ठेकेदार कामात बालमजूरांचा वापर करीत आहेत. वय वर्ष 10 ते 14 या वयाची लहान मुले या रस्त्यावर खडी, डांबर चे कामे करीत आहेत.या ठेकेदारावर व संबंधित खात्याचे अधिकारी, अभियंता यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता उत्तम निकम यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
 

Web Title: road construction work started in heavy rain in kasara area in cm gram sadak yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे