रस्ता कामासाठी देवस्थान बुजवले
By admin | Published: June 28, 2016 03:59 AM2016-06-28T03:59:56+5:302016-06-28T03:59:56+5:30
केडीएमसीने बुजवल्याचा आरोप करून वाडेघरच्या संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी केडीएमसीच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला
कल्याण : रस्त्याच्या कामासाठी ग्रामदेवतेची शिळा केडीएमसीने बुजवल्याचा आरोप करून वाडेघरच्या संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी केडीएमसीच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. देवस्थान जागेवरून हलवू देणार नाही, अन्यथा टोकाची भूमिका घेऊ, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
उंबर्डे, सापार्डे, वाडेघर आणि वाडेघरपाडा अशा चार गावांचे वाडेघर सीमेवर श्री ब्राह्मणदेव हे ग्रामदैवत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीवर हे दैवत आहे. तेथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम दोन दिवसांपूर्वी करण्यात आले होते. यात दुभाजकाच्या बाजूला असलेली ग्रामदेवतेची शिळा विकासकाने जेसीबी लावून कापण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती निघाली नाही. अखेर, त्यावर मातीचा भराव टाकून डांबरीकरण केले. हा प्रकार समजताच शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
देवाची विटंबना झाल्याचे निदर्शनास येताच संतप्त ग्रामस्थांनी डांबरीकरण झालेला रस्ता पुन्हा खोदला आणि बुजवलेली शिळा उकरून काढत त्याची पुन्हा पूजाअर्चा केली. यानंतर, ग्रामस्थांनी त्यांचा मोर्चा केडीएमसीच्या ‘ब’ प्रभाग कार्यालयावर नेला. तेथे प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार यांना वाडेघर संघर्ष समितीने निवेदन दिले. ग्रामस्थांना विश्वासात न घेता डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु, देवाची जागा न बदलता जेथे देव आहे, तेथेच त्याच्याभोवती सिमेंट कठडा बांधून द्यावा, अशी मागणी या वेळी त्यांनी केली. संबंधित जागा ही खाजगी होती. त्यामुळे संबंधित विकासकाला टीडीआर दिल्याचे स्पष्टीकरण पवार यांनी दिले. ज्या जागेवर देव आहे, त्या जमिनीचा
वाद न्यायालयात प्रलंबित
आहे. तरीही, केडीएमसीने विकासकाला टीडीआर कसा दिला, असा सवाल या वेळी संघर्ष समितीने प्रभाग अधिकारी प्रभाकर पवार यांना केला. (प्रतिनिधी)
>आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न
संघर्ष समितीने महापालिका मुख्यालयात जाऊन आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अन्य कामात व्यस्त असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही, अशी माहिती ग्रामस्थ देवानंद भोईर यांनी दिली.