रस्ते दुरुस्तीची कामे आता चोवीस तास
By admin | Published: December 9, 2015 01:11 AM2015-12-09T01:11:23+5:302015-12-09T01:11:23+5:30
रस्त्यांच्या दुरुस्ती कामे वाहतूक पोलिसांच्या परवानगीने केवळ रात्रीच करता येत होती. परिणामी, ही कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाला अवधी लागत होता
मुंबई : रस्त्यांच्या दुरुस्ती कामे वाहतूक पोलिसांच्या परवानगीने केवळ रात्रीच करता येत होती. परिणामी, ही कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाला अवधी लागत होता. मात्र, आता रस्ते दुरुस्तीची कामे २४ तास करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेला रस्ते दुरुस्तीची कामे पूर्वीपेक्षा अधिक वेगाने आणि कमी कालावधीत करणे शक्य होणार आहे.
या नव्या निर्णयामुळे २६ ठिकाणी प्रस्तावित असणाऱ्या रस्ते दुरुस्तीसाठी परवानगी मिळालेली आहे. यामध्ये शहर विभागातील ताडदेव, मलबार हिल, पायधुनी, काळबादेवी, भायखळा, नागपाडा, माटुंगा, भोईवाडा, वडाळा, वरळी, माहिम आणि कुलाबा येथील रस्त्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या सल्ल्यानुसार रस्ते दुरुस्तीची कामे करताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता कंत्राटदारांना घ्यावी लागणार आहे. शिवाय कामादरम्यान ध्वनी प्रदूषण होणार नाही, याचीही खबरदारी संबधितांना घ्यावी लागणार आहे. दरम्यान, ही कामे करताना चौकातील खोदकामाविषयक कामे पूर्वीप्रमाणेच रात्री ११ ते सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान करणे आवश्यक असणार आहे. (प्रतिनिधी)