रस्ते घोटाळा ३ हजार कोटींचा?
By Admin | Published: April 26, 2016 06:12 AM2016-04-26T06:12:05+5:302016-04-26T06:12:05+5:30
मुंबईचे रस्ते चकाचक करण्यासाठी ३ वर्षांचा मास्टर प्लान आखण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईचे रस्ते चकाचक करण्यासाठी ३ वर्षांचा मास्टर प्लान आखण्यात आला आहे. त्यानुसार रस्त्यांचे काँक्रिट आणि डांबरी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ७५०० कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. रस्त्यांच्या कामात अनियमितता असल्याचा आरोप दीड वर्षांपूर्वी झाला.
चौकशी अहवालात मात्र घोटाळा नेमका किती कोटींचा आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. तथापि, हा घोटाळा तब्बल २५०० ते ३००० कोटींचा असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दोन वर्षांत कामे करण्यात आलेल्या ३४ रस्त्यांची चौकशी झालेली आहे. तर दोन वर्षांत सुमारे सहा हजार कोटींची कामे झालेली आहेत. यातील ५३ टक्के अनियमितता म्हणजेच हा घोटाळा ३ हजार
कोटींचा असू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
रस्त्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने कामाच्या गुणवत्तेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे़ ही सार्वजनिक पैशांची नासाडी असून निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस चौकशी समितीने केली आहे़
या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने रस्ते व दक्षता विभागातील अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागणार आहे़
मात्र एकाचवेळी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई शक्य नसल्यामुळे सर्वप्रथम वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे़ त्यानंतर इतर अधिकाऱ्यांची या घोटाळ्यातील जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात येणार आहे़