नाशकात रस्ताच गेला चोरीला!
By admin | Published: June 22, 2017 04:58 AM2017-06-22T04:58:35+5:302017-06-22T04:58:35+5:30
सरकारी खात्यांनी केलेली विकासकामे गायब होण्याचे प्रकार नवीन नाहीत. इगतपुरी तालुक्यात तब्बल १३ लाख रुपयांचा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सरकारी खात्यांनी केलेली विकासकामे गायब होण्याचे प्रकार नवीन नाहीत. इगतपुरी तालुक्यात तब्बल १३ लाख रुपयांचा खडाडवाडी येथील रस्ताच गायब झाला आहे. बांधकाम खात्याच्या म्हणण्यानुसार त्यांनी रस्ता बांधला होता. ग्रामस्थ मात्र रस्ता झालाच नसल्याचे सांगत आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, चोरट्याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. सरकारी योजनांतील विहिरी गायब होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. खडाडवाडीचे हे १२ लाख ८७ हजार ६७३ रुपयांचे काम मजूर सोसायटीला देण्यात आले होते. कार्यारंभ आदेशाची प्रतही उपलब्ध आहे. ग्रामस्थांनी रस्ता होत नसल्याची चौकशी केल्यानंतर तो केव्हाच बांधल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थ चक्रावले आहेत. ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे रस्ता चोरीला गेल्याची तक्रार केली. श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते भगवान मधे यांनी बांधकाम अभियंत्यांना विचारणा केली असता त्यांनी रस्ता बांधल्याचे सांगितले.