रोड रोमिओला 'ती'ने शिकवला धडा!
By admin | Published: August 9, 2016 11:45 PM2016-08-09T23:45:02+5:302016-08-09T23:45:02+5:30
मुलीने चौकीनजीक उभ्या राहिलेल्या पोलिसांना या प्रकाराची माहिती देऊन पोलिसांसमोरच त्या मुलाच्या श्रीमुखात भडकावली
लोकमत आॅनलाईन
कऱ्हाड (सातारा), दि. 9 - फ्रेंडशीप करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने मुलीचा पाठलाग सुरू केला. संबंधित मुलीने नकार देऊनही त्याचा पाठलाग सुरूच होता. अखेर मुलीने चौकीनजीक उभ्या राहिलेल्या पोलिसांना या प्रकाराची माहिती देऊन पोलिसांसमोरच त्या मुलाच्या श्रीमुखात भडकावली. शहरातील चावडी चौकात मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरानजीकच्या एका गावातील मुलगी मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे बसस्थानकात आली. तेथून ती चालत महाविद्यालयाकडे जात होती. त्यावेळी एका मुलाने तिचा पाठलाग सुरू केला. रस्त्यात काही अंतर गेल्यानंतर त्याने त्या मुलीला अडवले. त्याने तिला फ्रेंडशीप करणार का, असे विचारले. मात्र, त्याला नकार देऊन मुलगी पुढे गेली. मात्र, तरीही त्या मुलाने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. मुलगा पाठीमागून येत असल्याने मुलगी घाबरली.
ती लवकरात लवकर कॉलेजमध्ये पोहोचण्याच्या मन:स्थितीत होती. मात्र, मुलगा तिचा पिच्छा सोडत नव्हता. त्यामुळे घाबरलेली मुलगी अक्षरश: घामाने भिजली. त्यावेळी चावडी चौकात काही पोलिस कर्मचारी उभे असल्याचे मुलीला दिसले. धाडस करून ती त्याठिकाणी गेली.
अचानक एक कॉलेजमधील मुलगी घाबरलेल्या स्थितीत समोर उभी राहिल्याचे पाहून ती संकटात असावी, हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तिने रडतच एक मुलगा माझा पाठलाग करून त्रास देत आहे, असे सांगितले. पोलिसांनी मुलाबाबत विचारणा केली असता मुलीने संबंधित मुलाकडे बोट दाखवले. पोलिसांनीही तातडीने संबंधित मुलाला ताब्यात घेतले. मुलीसमोर आणून त्याच्याकडे त्यांनी चौकशी सुरू केली. मात्र, त्याचवेळी संतापलेल्या मुलीने संबंधित मुलाच्या श्रीमुखात लगावली.
घटना समोर येताच त्याठिकाणी गर्दी जमली. नागरिकांनी संबंधित मुलावर संताप व्यक्त केला. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी संबंधित मुलगी व मुलाला शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात आले. संबंधित मुलगा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला समज देऊन नातेवाइकांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)