रस्ता रुंदीकरण उद्यापासून
By Admin | Published: April 6, 2017 03:35 AM2017-04-06T03:35:07+5:302017-04-06T03:35:07+5:30
निवडणूक काळात थंडावलेली रस्ता रुंदीकरणाची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला
ठाणे : निवडणूक काळात थंडावलेली रस्ता रुंदीकरणाची मोहीम पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. त्यानुसार, मागील काही महिने चर्चेत असलेला समतानगर रोड नं. ३३ वर पहिला हातोडा पडणार असून यासोबत शहरातील अन्य तीन रस्त्यांवरही तो टाकला जाणार आहे. येत्या ७ एप्रिलला त्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेने २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये ५२.४२१ किमी लांबीचे १०९ रस्तेबांधणीचा कार्यक्रम आखला असून हे सर्व रस्ते २०१७-१८ मध्ये पूर्ण करण्याचा पालिकेचा संकल्प आहे. त्यानुसार, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आयुक्त जयस्वाल यांनी पोखरण रोड नं. १, २, शास्त्रीनगर ते हत्तीपूल, सुभाष पथ (एसटी स्टॅण्ड ते कलेक्टर आॅफिस), खोपट रस्ता, मुंब्रा स्टेशन ते वाय जंक्शन, कापूरबावडी सर्व्हिस रस्ता, घोडबंदर सर्व्हिस रस्ता आदी भागांत रुंदीकरणाची कारवाई केली होती. त्यानंतर निवडणुकीमुळे कारवाईला ब्रेक लागला होता.
दरम्यान, आता पुन्हा रस्ता रुंदीकरणाची मोहीम पालिकेने हाती घेतली असून येत्या ७ एप्रिलला पहिला हातोडा पडणार आहे. मागील काही महिने समतानगर येथे रोड नं. ३३ चर्चेचा विषय ठरला होता. या रस्त्यामध्येच शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाचा बंगला असल्याने या कारवाईला विरोध झाला होता. महासभेतदेखील हा विषय चांगलाच गाजला होता. आयुक्त जयस्वाल यांनी रस्तारूंदीकरणासाठी बेकायदा बांधकामांवर सातत्याने कारवाई केल्याने नागरिकांनी याचे स्वागत केले होते. (प्रतिनिधी)
>अडथळे झाले दूर
आता या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर झाले असून त्यावर पहिला हातोडा पडणार आहे. तसेच याच दिवशी नुरीबाबा दर्गा रोड, आर मॉलजवळील मनोरमानगरला थेट जोडणारा रस्ता आणि गुरुकुल पाचपाखाडी भागातील रस्त्यावर हातोडा टाकला जाणार आहे.