मुंबईत रस्त्यांच्या कामात घोटाळा
By admin | Published: April 26, 2016 06:37 AM2016-04-26T06:37:54+5:302016-04-26T06:37:54+5:30
सरासरी ५३ टक्के अनियमितता असल्याचा गंभीर ठपका महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना सोपवलेल्या अहवालात ठेवण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईत कोणत्याही रस्त्याचे काम ठरलेल्या मापदंडानुसार झालेले नसून त्यात सरासरी ५३ टक्के अनियमितता असल्याचा गंभीर ठपका महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना सोपवलेल्या अहवालात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई नगरपालिकेत रस्त्यांच्या कामात घोटाळा असल्याची कबुलीच प्रशासनाने दिली आहे. या घोटाळ्यात रस्ते विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्यातील अधिकारी उदय मुरुडकर यांना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे़ मात्र मुरुडकर यांना नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे, तर अशोक पवार आता इमारत देखभाल खात्यात आहेत़
मुंबईत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत़ यापैकी ३४ कामांमध्ये अनियमितता असल्याचा संशय महापौर स्नेहल आंबेकर यांनी व्यक्त केला होता़ त्यानंतर आयुक्त अजय मेहता यांनी चौकशीचे आदेश दिले होते़ अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज महापौरांकडे चौकशी अहवाल सादर केला़