रस्त्यांची कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2016 02:55 AM2016-07-26T02:55:20+5:302016-07-26T02:55:20+5:30
पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांच्या तुलनेत अत्यल्प निधी वितरीत झाल्याने राज्यातील रस्त्यांची कामे रखडली असल्याची कबुली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी
मुंबई : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कामांच्या तुलनेत अत्यल्प निधी वितरीत झाल्याने राज्यातील रस्त्यांची कामे रखडली असल्याची कबुली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. विशेष म्हणजे, या योजनेसाठी सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षात केंद्राकडून राज्याला एक रुपयाचाही निधी मिळाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपा सदस्य अपूर्व हिरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री भुसे म्हणाले की, पंतप्रधान ग्रामसडक योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. या योजनेतून केंद्राने चालू वर्षासाठी राज्याला ६०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर निधीपैकी आतापर्यंत केवळ ११६ कोटी रुपये राज्याला मिळाले आहेत. या योजनेसाठी राज्य सरकारचा हिस्सा ४०४ कोटी रुपयांचा असून राज्यानेही अवघे ७७ कोटी रुपये वितरीत केले आहेत. तर, गेल्यावर्षी या योजनेसाठी केंद्राने राज्याला ५५३ कोटी रुपये दिले होते. दुसरीकडे राज्य सरकारने स्वत:च्या हिश्शांचे १७६ कोटी रुपये गेल्यावर्षी वितरीत केले आहेत. या योजनेसाठी सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या दोन वर्षात केंद्र सरकारकडून निधीच मिळाला नाही. परिणामी निधीअभावी या योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत. जी गत केंद्राच्या निधीची तीच अवस्था राज्याच्या निधी वाटपाची सुद्धा आहे. पैसे मिळत नसल्याने ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडून दिली आहेत, असे भुसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांनी माणगाव लोणशी ते उणेगाव रस्त्याच्या कामाची गेली तीन वर्षे चौकशीच झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. रस्ता बांधल्यानंतर पुढील पाच वर्षे रस्त्याची देखभाल करणे ठेकेदारावर बंधनकारक असताना सुद्धा या रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे, असे ते म्हणाले. त्यावर एका महिन्यात कामाची चौकशी केली जाईल, असे आश्वासन भुसे यांनी यावेळी दिले.