मुंबईत समन्यायी पाणीवाटपासाठी २ महिन्यांत रोडमॅप - मुख्यमंत्री
By admin | Published: April 13, 2016 01:56 AM2016-04-13T01:56:05+5:302016-04-13T01:56:05+5:30
मुंबईमध्ये पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी येत्या दोन महिन्यांत एक रोडमॅप तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महापालिकेला दिले. या समन्यायी
मुंबई : मुंबईमध्ये पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी येत्या दोन महिन्यांत एक रोडमॅप तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महापालिकेला दिले. या समन्यायी वाटपासाठी मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि जलतज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल, असे त्यांनी विधानसभेत जाहीर केले.
मुंबईत दररोज प्रतिदिन ९०० एमएलडी पाण्याची गळती होत असल्याची कबुलीही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. मुंबईत पाणी मुबलक आहे, पण वितरण व्यवस्था सक्षम नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखविली. मुंबईतील विशेषत: पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणीटंचाईबाबत भाजपाचे सदस्य योगेश सागर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. शहरांतील विविध भागांना असमान पाणीवाटप अन्यायकारक असल्याचे सांगून, त्यांनी जुन्या जलवाहिन्यांमुळे किती प्रचंड पाणी वाया जाते, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर दररोज ९०० एमएलडी पाण्याची गळती होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.
मुंबईत ८० ते १०० वर्षे जुन्या जलवाहिन्या आहेत. त्या गंजलेल्या आणि गळक्याही आहेत. त्यामुळे मुंबईत जो पाणीप्रश्न भेडसावत आहे, तो प्रामुख्याने पाणीवितरणातील उणिवांमुळे आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा एक प्रकल्प तयार केला असून, त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आशिष शेलार, मनिषा चौधरी, राम कदम, अतुल भातखळकर, सुनील प्रभू आदी सदस्यांनी या लक्षवेधीवर बोलताना, मुंबई उपनगरातील पाणीटंचाईच्या समस्या लक्षात आणून दिली.
राम कदम यांनी घाटकोपर परिसरात रहिवाशांना दोन-दोन फूट खड्डा खणून त्यातून पाणी भरावे लागत असल्याचे सांगितले, तर मनिषा चौधरी यांनी गोरेगाव ते दहीसरमधील झोपडपट्टीवासियांना अत्यंत कमी पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत, बऱ्याच भागांत पाणी गायब असल्याचे सांगितले. तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचना महापालिकेने त्या रोडमॅपमध्ये लक्षात घेऊन उपाययोजना करावी, असे निर्देशही देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)