रस्त्यांचे ३० तर पुलाचे आयुर्मान १०० वर्षे!
By Admin | Published: April 30, 2017 01:24 AM2017-04-30T01:24:03+5:302017-04-30T01:24:03+5:30
नव्याने बांधलेल्या रस्त्याची वर्षभरातच दुर्दशा होत असल्याने त्याला चाप लावण्यासाठी शासनाने आता रस्ते व पुलांचे आयुर्मान निश्चित केले आहे.
यवतमाळ : नव्याने बांधलेल्या रस्त्याची वर्षभरातच दुर्दशा होत असल्याने त्याला चाप लावण्यासाठी शासनाने आता रस्ते व पुलांचे आयुर्मान निश्चित केले आहे. तसेच त्याची संपूर्ण जबाबदारी बांधकाम अभियंते व कंत्राटदारांवर टाकण्यात आली असून त्यात हयगय झाल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाईही केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या २७ एप्रिलच्या आदेशानुसार आता डांबरी रस्त्याचे आयुर्मान १५ वर्षे, काँक्रीट रस्त्याचे ३० वर्षे तर पुलाचे आयुर्मान शंभर वर्षे असे निश्चित करण्यात आले आहे. कंत्राटदारांना हे आयुर्मान गृहित धरूनच कामे करावी लागणार आहेत. रस्त्यांना खड्डे पडल्यास, काम खराब झाल्यास किंवा पूल पडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदार व संबंधित पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यावर राहणार आहे. तशी अटच निविदेत नमूद केली जाईल. या अटीचा भंग झाल्यास संबंधितांवर दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. द्वि-वार्षिक देखभाल दुरुस्ती व कालबद्ध नूतनीकरणाच्या कामांना मात्र या नव्या अटीतून वगळण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)