बेल्हा परिसरात रस्त्यांची लागली वाट
By admin | Published: June 10, 2016 01:29 AM2016-06-10T01:29:28+5:302016-06-10T01:29:28+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासिनतेमुळे व अकार्यक्षमतेमुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली
बेल्हा : जांबुतफाटा ते बोरी बेल्हा (ता. जुन्नर) या पुणे-नाशिक महामार्गाला जोडून असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासिनतेमुळे व अकार्यक्षमतेमुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. यामुळे गावांचा विकास खुंटला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
जांबुतफाटा ते बोरी बेल्हा हा अहमदनगर व पारनेर या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा जवळचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. जांबुतफाटा ते बेल्हा या १४ किमी रस्त्यावर ठिकठिकाणी असंख्य खड्डे पडले आहेत. यापैकी २ किमी अंतरावर डांबरीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावरील सर्व गावांमध्ये उसाचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. ऊसतोडणी काळात ऊस वाहतूक करणारे ट्रक, बैलगाडी, ट्रॅक्टर ही वाहने ऊसाच्या भारामुळे व एकेरी रस्ता असल्याने रस्त्याच्या खाली उतरत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांमध्ये वाहन बाजूला घेण्यावरून भांडण व मारामारीचे प्रकार घडतात. शालेय मुलांची ये-जा रस्त्यावरून कायम असते. अनेक वेळा ऊसाचे वाहन साईडपट्ट्या भरण्यात आलेल्या नसल्यामुळे वाहने उलटतात.
पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित न बुजविल्यामुळे पुन्हा खड्डे झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी खड्ड्यात फक्त मातीच टाकून बुजवितात. त्यामुळे माती निघून पुन्हा खड्डा पडतो, असे वारंवार होते, असे निवेदन सार्वजनिक बांधकाममंत्री, कार्यकारी अभियंता पुणे, जिल्हाधिकारी, पालकमंत्री आदींना सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव व राजेंद्र भोर यांनी पाठविलेली आहेत. (वार्ताहर)