ट्रॅव्हल्सनी बळकावले रस्ते
By admin | Published: June 9, 2016 02:58 AM2016-06-09T02:58:26+5:302016-06-09T02:58:26+5:30
खाजगी ट्रॅव्हल्सच्या अवैध बसथांब्यांमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे.
सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- खाजगी ट्रॅव्हल्सच्या अवैध बसथांब्यांमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. या ट्रॅव्हल्स रस्त्यावरच उभ्या होत असल्यामुळे गंभीर अपघाताची देखील शक्यता निर्माण झाली आहे. यानंतरही संबंधित प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सायन-पनवेल मार्गावर तसेच ठाणे -बेलापूर मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचे अवैध थांबे तयार झाले आहेत. ज्याठिकाणी एसटीचे बस थांबे आहेत त्याच जागेवर ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात आहेत. यामुळे त्याठिकाणी वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. त्यापैकी वाशी, सानपाडा, कळंबोली व पनवेल ही मुख्य ठिकाणे आहेत. सायन-पनवेल मार्गावर तसेच ठाणे- बेलापूर मार्गावरील एसटीचे बसथांबे हेच खासगी ट्रॅव्हल्सचे थांबे झाले आहेत. त्याठिकाणी एकाच वेळी चार ते पाचपेक्षा जास्त बस थांबत असल्यामुळे इतर वाहनांना रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय ट्रॅव्हल्सच्या बस उभ्या असल्यामुळे एसटीच्या बस त्यांच्याच थांब्यापर्यंत पोहचू शकत नाहीत. याचा नाहक त्रास एसटीच्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे. रहिवासी विभागांमध्ये देखील खासगी ट्रॅव्हल्सचे अवैध थांबे तयार झाले आहेत. त्यामध्ये कोपरखैरणे तीन टाकी व वाशी सेक्टर १५ या ठिकाणांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गांवर सतत वाहनांची वर्दळ असते. अशात खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तयार केलेल्या थांब्यांमुळे अधिकच वाहतूककोंडी वाढलेली आहे. कोपरखैरणे व घणसोली परिसरात पुणे व वाई परिसरातील रहिवाशांचे अधिक वास्तव्य आहे. त्यांना गावी जाण्यासाठी थेट घरापासून प्रवासाच्या सुविधेच्या नावाखाली या ट्रॅव्हल्स रहिवासी क्षेत्रातही प्रवेश करत आहेत. विशेष करून प्रत्येक शनिवारी, रविवारी गावी जाणाऱ्यांना त्यांच्याकडून लक्ष्य केले जात आहे.
त्याठिकाणी उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या गाड्यांवर यापूर्वी वाहतूक पोलिसांनी अनेकदा कारवाई केलेली आहे. शिवाय रहदारीच्या ठिकाणी होणारी कोंडी टाळण्यासाठी ट्रॅव्हल्सकरिता काही अंतरावर पर्यायी जागा सुचवण्यात आलेली होती. यानंतरही वाशी प्लाझालगतच्या त्याच ठिकाणी या खासगी बस उभ्या केल्या जात आहेत, तर सानपाडा रेल्वेस्थानकासमोरील पुलाखालील मोकळी जागा व सर्व्हिस रोड त्यांनी बसथांब्यासाठी अवैधरीत्या बळकावला आहे. यामुळे एपीएमसी मार्केटमधून येणाऱ्या मालवाहतूक वाहनांची तसेच मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची त्याठिकाणी कोंडी होत आहे. यानंतरही त्यावर आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे सर्वसामान्य प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
>खासगी ट्रॅव्हल्सच्या अवैध थांब्यांमुळे त्याठिकाणी प्रवासी वाढू लागल्याचे हेरून अनधिकृत फेरीवाल्यांनी देखील बस्तान मांडले आहे. अशाच प्रकारामुळे वाशी पुलाखाली शासनाच्याच बसथांब्यावर एसटी पोरकी झाल्याचे पहायला मिळत आहे. वाहतूक पोलीस चौकीसमोरच खाजगी बसेस उभ्या राहत असूनही पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.