दहिवली-श्रीनगरमधील रस्ता नगरोत्थानमधून मंजूर
By Admin | Published: July 19, 2016 02:47 AM2016-07-19T02:47:24+5:302016-07-19T02:47:24+5:30
कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली-श्रीनगर परिसरात सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत.
कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली-श्रीनगर परिसरात सध्या अनेक समस्या भेडसावत आहेत. समस्यांबाबत रहिवाशांनी नगरपरिषदेच्या प्रशासनाकडे अनेकदा निवेदने दिली आहेत, मात्र नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नगरपरिषद हद्दीतील श्रीनगर परिसरातील लालाजी ड्रीम रेसिडेन्सीच्या मागील रहिवाशांनी जून २०१४ रोजी कर्जत नगरपरिषद प्रशासनास पत्र दिले होते. गेल्या २५-३० वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास असलो तरी अद्याप लाइट, पाणी, रस्ता या सुविधा करून देण्यात आल्या नसल्याचे निवेदन देण्यात आले होते. मात्र नगरपरिषदेने आजपर्यंत त्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले नाही.
पावसाळ्यात रस्त्यावरून चालणे कठीण होते. रस्त्यावर दिवाबत्तीची सोय नाही, परिसरातील नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी, २५ जूनला नगरपरिषदेला स्मरण पत्र दिले. याची दखल घेत कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे, शाखा अभियंता राजेंद्र मयेकर, स्थापत्य अभियंता नीलेश चौडीये यांनी जाऊन रस्त्याची पाहणी केली. हा रस्ता नगरोत्थानमधून तयार करण्यात येणार असून त्यासाठी ७० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळा संपल्यानंतर सुमारे ८०० मीटर रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांनी दिली. (वार्ताहर)