पावसापूर्वी रस्ते होणार चकाचक
By admin | Published: May 16, 2016 02:57 AM2016-05-16T02:57:13+5:302016-05-16T02:57:13+5:30
शहरात सध्या विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचीे कामे सुरू आहेत
ठाणे : शहरात सध्या विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचीे कामे सुरू आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरून ये-जा करताना वाहनचालकांबरोबर पादचाऱ्यांनाही वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तरी हे रस्ते पूर्ण होणार का, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वीच सर्व रस्ते स्वच्छ करणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रुंदीकरण केलेल्या सर्व भागांचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी इतक्या कमी कालावधीत करणे शक्य नसल्याने मुख्य रस्त्यांमध्ये रुंदीकरणाच्या कामाचा अडथळा येणार नाही, याची दक्षता घेऊन हे रस्ते साफ करणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे शहराच्या बहुतांश भागांत सध्या शहराचा चेहरामोहराच बदलून टाकणाऱ्या व्यापक रस्ते रुंदीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. २४ तास हे काम सुरू असून, रस्ता रुंदीकरणाबरोबर सध्याच्या रस्त्यांच्या डागडुजीचे कामही सुरू केल्याची माहिती प्रभारी नगर अभियंता रतन अवसरमोल यांनी दिली. रुंदीकरण मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सामानाची नासधूस, अनेक बांधकामे पाडल्याने पावसाळ्यापूर्वी ते उचलले गेले नाही, तर चिखल होऊन नागरिकांना चालणेदेखील कठीण होईल. यासाठी हे सर्व रॅबीट आणि अन्य सामान स्वच्छ करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.