रस्त्यावर मंडपांना परवानगी नाही!
By admin | Published: August 4, 2015 01:50 AM2015-08-04T01:50:09+5:302015-08-04T01:50:55+5:30
यंदातरी रत्यावर मंडप उभारण्यास परवानगी द्यावी अशी सातत्याने मागणी करणाऱ्या मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयाने आज चांगलीच कानउघडणी केली.
मुंबई : यंदातरी रत्यावर मंडप उभारण्यास परवानगी द्यावी अशी सातत्याने मागणी करणाऱ्या मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयाने आज चांगलीच कानउघडणी केली. त्यामुळे वाहतुकीला व पादचाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच उत्सव मंडळांना परवानगी द्यावी, या आदेशाचे पालन केले जाईल, अशी हमी देण्याची नामुश्की महापालिकेवर ओढवली. त्यामुळे यंदा मुंबईतील रस्त्यांवर उत्सव मंडळे आणि त्यांचे मंडप दिसणार नाहीत.
गेल्या महिन्यात न्यायालयाने कान पिळल्यानंतर पालिकेने उत्सव मंडळांना मंडपांसाठी परवानगी देणारे धोरण आखले. या धोरणाची प्रत पालिकेने सोमवारी न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सादर केली. वाहतूक व पादचाऱ्यांना मंडपांचा
त्रास होत असल्यास त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग दिला जाईल, अशी तरतूद या धोरणात पालिकेने केली आहे. याकडे न्या. ओक यांनी पालिकेचे वकील अनिल साखरे यांचे लक्ष वेधले. ही तरतूद आम्ही दिलेल्या आदेशाच्या विरुद्ध असल्याचे ते म्हणाले.
वाहतुकीला व पादचाऱ्यांना
त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश आम्ही दिले होते. तरीही पालिकेने रस्त्यावर मंडप उभारण्याचे व त्याने पादचाऱ्यांना आणि वाहतुकीला त्रास झाल्यास पर्यायी मार्गिका देण्याची तयारी दाखवली, हे गैर आहे, असे न्यायालयाने सुनावले.
त्यावर तत्काळ न्यायालयात हजर असलेले पालिकेचे उपायुक्त आनंद वागराळकर यांनी खंडपीठाने मार्च महिन्यात दिलेल्या आदेशाचे पालन करूनच मंडपांना परवानगी दिली जाईल, अशी हमी अॅड. साखरे यांच्यामार्फत दिली.
खंडपीठाने मार्च महिन्यात वरील आदेश दिले होते. त्यामुळे रस्त्यांवर मंडपांसाठी स्वत:हून प्रयत्न करणाऱ्या पालिकेला चांगलीच चपराक बसली आहे. (प्रतिनिधी)