लक्ष्मी रस्त्यावर वाहनबंदी

By admin | Published: May 20, 2016 01:35 AM2016-05-20T01:35:45+5:302016-05-20T01:35:45+5:30

लक्ष्मी रस्त्याच्या बाजारपेठेतील काही भागाचे देखण्या वॉकिंग प्लाझात रूपांतर करण्याबाबत महापालिकेत पदाधिकारी व प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने विचार सुरू

Roadshopping on Lakshmi Road | लक्ष्मी रस्त्यावर वाहनबंदी

लक्ष्मी रस्त्यावर वाहनबंदी

Next


पुणे : पुणे शहराचे वैभव असणाऱ्या लक्ष्मी रस्त्याच्या बाजारपेठेतील काही भागाचे देखण्या वॉकिंग प्लाझात रूपांतर करण्याबाबत महापालिकेत पदाधिकारी व प्रशासकीय स्तरावर गांभीर्याने विचार सुरू आहे. ग्राहकांना मोकळेपणाने फिरून खरेदी करता यावी तसेच प्रसंगी पदपथावर विश्रांतीही घेता यावी या पद्धतीने हा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर लवकरच वाहनबंदी होण्याची शक्यता आहे.
लक्ष्मी रस्ता हा शहरातील सर्वाधिक जुना व सर्वाधिक गर्दीचाही रस्ता आहे. सुमारे ३ किलोमीटर अंतराच्या लक्ष्मी रस्त्याचा अलका चित्रपटगृह चौक ते सोन्या मारुती चौक हा साधारण दीड किलोमीटर अंतराचा भाग बाजारपेठेचा भाग आहे. तिथे कायम रहदारी असते व गर्दीही असते. विशेषत: सायंकाळच्या वेळी या रस्त्यावरून पायी चालता येणे अत्यंत अवघड होते. ग्राहकांनाही वाहनांच्या व पादचाऱ्यांच्या गर्दीतून वाट काढत खरेदी करावी लागते. ही गजबज टाळून रस्ता मोकळा व सुटसुटीत व्हावा यासाठी रस्त्याच्या या भागावर वॉकिंग प्लाझा करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
रस्त्याच्या या भागावरून वाहनांना धावण्यास किंवा रस्त्यावर लावण्यासही मनाई केल्यानंतरच ही कल्पना प्रत्यक्षात येणे शक्य आहे. त्यासाठी बरेच पर्याय प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून पुढे आले आहेत. त्यातील पहिला पर्याय रस्त्यावर पूर्ण वेळ वाहनबंदी करायची असा आहे. त्यासाठी दुकानदारांच्या तसेच ग्राहकांच्याही वाहनांना पर्यायी रस्ता किंवा वाहनतळ देणे गरजेचे आहे.
दुसरा पर्याय रस्त्याच्या या भागावर दुपारी ३ ते रात्री ८ या गर्दीच्या वेळेत वाहनबंदी करायची असा आहे. त्यासाठीही वाहनतळ असणे व पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
तिसरा पर्याय सध्या सुरू असलेली एकेरी वाहतूक रस्त्याच्या एका बाजूने वाहने सुरू ठेवणे व दुसरी बाजू पूर्णपणे मोकळी ठेवणे असा आहे. याशिवाय अन्य काही पर्यायांवरही विचार सुरू असून, पालिकेची अधिकारी यासंदर्भात वाहतूक शाखेबरोबर चर्चा करणार आहेत. (प्रतिनिधी)
पदपथांवर विश्रांतीची सोय
वाहनबंदीबरोबरच रस्त्याच्या दोन्ही बाजंूच्या पदपथांचाही यात विकास करण्यात येईल. त्यांची रुंदी वाढवून ते प्रशस्त करण्यात येणार आहेत. त्याशिवाय पदपथांवर विश्रांतीसाठी आकर्षक बाक, काही ठिकाणी चहा किंवा थंड पेय मिळण्याची व्यवस्था, माहितीदर्शक फलक अशा प्रकारची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठीही पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना व्यावसायिक कंपन्यांकडून डिझाईन तयार करून घेण्यास सांगण्यात आले आहे.
पदपथांच्या विकासासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात ४० कोटी रुपयांची तरतूद आहे. त्याचा वापर करण्यात येईल. रस्त्यावरील व्यापारीवर्गाचा याला विरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्याबरोबर चर्चा करून यातून मार्ग काढता येईल. लक्ष्मी रस्त्यावरील वाहनांचा, गर्दीचा ताण कमी करून तो शहरातील एक आकर्षक रस्ता करण्याचा हा प्रयत्न आहे.
- प्रशांत जगताप, महापौर

Web Title: Roadshopping on Lakshmi Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.