उपसरपंच निघाला दरोडेखोर
By Admin | Published: June 21, 2016 03:51 AM2016-06-21T03:51:35+5:302016-06-21T03:51:35+5:30
संकटकाळात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा, ग्रामीण निवडणुकीत पॅनल उभे करणारा एक गावपुढारी यवतमाळातील दरोडेखोरांच्या टोळीचा मास्टर मार्इंड निघाला आहे.
यवतमाळ : संकटकाळात गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा, ग्रामीण निवडणुकीत पॅनल उभे करणारा एक गावपुढारी यवतमाळातील दरोडेखोरांच्या टोळीचा मास्टर मार्इंड निघाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या या कृत्याचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे, पुणे आणि हैदराबादमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आल्याने यवतमाळ पोलिसांनी तपासाची दिशा पुण्यावर केंद्रीत केली आहे.
संजय विठ्ठलप्रसाद मिश्रा ऊर्फ पंडित मिश्रा (४२) असे या गावपुढाऱ्याचे नाव आहे. पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत काळीदौलत सर्कलमधील कान्हा (ता. महागाव) या गावचा तो उपसरपंच आहे. यवतमाळात २३ जानेवारी रोजी गजबजलेल्या दारव्हा रोडवरील सतीश फाटक यांच्या घरी भरदुपारी पडलेल्या दरोड्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. आठ दरोडेखोरांपैकी सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन रिव्हॉल्वर, ११ राऊंड, सात मोबाईल, खंजीर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
संजय मिश्रा हा या टोळीचा मास्टर मार्इंड असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली. त्याने अलिकडेच ग्रामपंचायत निवडणुकीत आपले पॅनल उतरविले होते. मात्र त्याच्यावर पुणे आयुक्तालयातसुद्धा दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जाते. तसेच चार वर्षांपूर्वी हैदराबाद येथेही दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. पोलिसांनी या गुन्ह्यावर लक्ष केंद्रीत
केले आहे. (प्रतिनिधी)