महामार्गावर लूटमार करणारी टोळी जेरबंद

By admin | Published: September 18, 2016 12:45 AM2016-09-18T00:45:42+5:302016-09-18T00:45:42+5:30

पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळेस गाड्या अडवून लूटमार करणारी टोळी पकडण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले आहे.

Robbery gang robbery on the highway | महामार्गावर लूटमार करणारी टोळी जेरबंद

महामार्गावर लूटमार करणारी टोळी जेरबंद

Next


भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळेस गाड्या अडवून लूटमार करणारी टोळी पकडण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेल्या चार दुचाकींसह चोरीचा ऐवजही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे स्वागत करण्यात आले.
अक्षय सूर्यवंशी (रा. रणगाव, वालचंदनगर, ता. इंदापूर), गौरव पांडुरंग चव्हाण (रा. किल्ला, करमाळा), महेश गायकवाड (रा. रणगाव), अमर पंढरीनाथ कौन्डुभैरी (रा. रणगाव) अशी पकडण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या चार दुचाकी, लुटलेली रक्कम, तसेच इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सी. एम. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून रात्रीच्या वेळेस पुणे-सोलापूर महामार्गावरील भादलवाडी ते पळसदेव या टप्प्यात ट्रकचालकाला अडवून मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून लुटल्याच्या काही प्रकारची माहिती पोलीस ठाण्याला मिळाली होती. हा प्रकार वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकबाबतीत जास्त होत असल्याचे आढळून आले. यादव यांनी भिगवण पोलीस ठाण्याचे चार-पाच पोलीस आणि या भागातील पोलीसमित्र यांची एक टीम तयार करून साध्या वेशात तपासणी चालू ठेवली होती. गणेश विसर्जनाच्या दिवशी १५ तारखेला रात्री १०.३० च्या सुमारास भादलवाडी येथील कागद कारखान्याच्यासमोर पाच चोरट्यांनी आपल्या मोटारसायकल आडव्या लावून यातील ट्रकचालक आणि क्लीनर यांना मारहाण करीत त्यांच्याकडील २६ हजार ५०० रुपये चाकूचा धाक दाखवीत लुटले. याच वेळी साध्या वेशात असणारे
पोलीस आणि पोलीसमित्रांच्या लक्षात हा प्रकार आला. ते
ट्रकशेजारी थांबेपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस नाईक गोरख पवार आणि इन्कलाब पठाण यांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)
>एकेरी मार्गावर विरुद्ध दिशेने जवळपास आठ किलोमीटर आपल्या जिवाची पर्वा न करता पाठलाग करीत या चोरट्यांना जेरबंद केले. ही कारवाई भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी सी. एम. यादव, गोरख पवार, श्रीरंग शिंदे, रमेश भोसले करीत आहेत. गुन्ह्याच्या तपासकामी नेमलेल्या टीममध्ये पोलीसमित्र अविराज जगताप, समाधान पिसे, सागर शिंदे, सिद्धार्थ आळंदकर, अमित चांदगुडे यांनी कामगिरी केली.

Web Title: Robbery gang robbery on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.