चक्क पोलीस ठाण्यातच डल्ला; 185 मोबाईलसह 7 लाखांची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 14:53 IST2020-01-12T14:51:05+5:302020-01-12T14:53:57+5:30
पोलिसांकडून तपास सुरू; पोलीस ठाण्यातल्या चोरीची शहरात चर्चा

चक्क पोलीस ठाण्यातच डल्ला; 185 मोबाईलसह 7 लाखांची रोकड लंपास
कोल्हापूर: बँका, मंदिरं, घरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना काही नवीन नाहीत. असे प्रकार घडल्यावर लगेचच पोलिसांना माहिती दिली जाते. यानंतर पोलिसांकडून तपास केला जातो. मात्र कोल्हापूरमध्ये चक्क पोलीस ठाण्यावरच चोरट्यानं डल्ला मारला आहे. त्यामुळे पोलीस ठाणंच सुरक्षित नसेल, तर मग सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोल्हापूरातील जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून तब्बल १८५ मोबाईल चोरीला गेले आहेत. पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये हे मोबाईल हस्तगत केले होते. त्यांची किंमत जवळपास दोन लाख रुपयांच्या घरात आहे. गुरुवारी रात्री उशिरा हा संपूर्ण प्रकार घडला. सध्या कोल्हापुरात सर्वत्र याच घटनेची चर्चा आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महमद पटेल यांनी तक्रार दाखल केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गुरुवारी रात्री उशिरा पोलीस ठाण्याच्या कारकून स्टोअर रूममध्ये अज्ञातानं प्रवेश केला. लोखंडी कपाटातून विविध गुन्हे व कारवाईत जप्त करण्यात आलेले १८५ मोबाईल फोन त्यानं लंपास केले. याशिवाय ७ लाखांची रोकडदेखील लांबवली. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं. यासोबत ठसे तज्ज्ञांच्या मदतीनं काही पुरावेदेखील गोळा करण्यात आले.
सध्या पोलीस शहर व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. इचलकरंजी आणि कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पथक, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचं गुन्हे शोध पथक, उपविभागीय कार्यालयाचे पोलीस पथक यांच्याकडून सध्या या प्रकरणाचा शोध सुरू आहे. या प्रकरणी रेकॉर्डवरील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.