टॅक्सीत लिफ्ट देण्याच्या नावाखाली लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2017 03:36 AM2017-04-29T03:36:36+5:302017-04-29T03:36:36+5:30
रात्री-अपरात्री गरजू प्रवाशांना शेअरिंग टॅक्सीत लिफ्ट देण्याच्या नावाखाली लूट करणारी टोळी सक्रिय झाल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाले.
मुंबई : रात्री-अपरात्री गरजू प्रवाशांना शेअरिंग टॅक्सीत लिफ्ट देण्याच्या नावाखाली लूट करणारी टोळी सक्रिय झाल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाले. या टोळीतील पाच जणांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. नूर आलेम, दीपू मारवाडी, सलमान, मोहम्मद अमीर, छोटू अशी अटक आरोपींची नावे आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे रात्रीच्या वेळेस घरी जाण्यासाठी अनेक प्रवाशांना वाहन मिळण्यास अडचणी निर्माण होतात. अशा प्रवाशांना हेरून ही मंडळी त्यांना शेअरिंगवर घेऊन जाण्याचे आमिष दाखवितात. त्यानंतर भररस्त्यात त्यांना टॅक्सीतच मारहाण करत लूट करण्यात येते. त्यानंतर धमकावून प्रवाशांना खाली उतरवून ही मंडळी पळ काढतात. याबाबतच्या तक्रारी मुंबई पोलिसांना येत असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. याबाबत नवी मुंबई पोलिसांतदेखील तक्रारी दाखल आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष ४ला यामागे मोठे रॅकेट असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने अधिक तपास सुरू केला. तपासात या टोळीतील काही जण हे वडाळा येथील राहणारे असल्याचे समजले. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून पाच जणांना अटक केली. तर या माथेफिरूंनी एका महिलेचे क्रेडिट कार्ड पळवून पैसे काढल्याचेही तपासाअंती उघडकीस आले आहे. (प्रतिनिधी)