नोकरीसाठी दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी दरोडा
By admin | Published: April 11, 2016 03:15 AM2016-04-11T03:15:50+5:302016-04-11T03:15:50+5:30
भावाला नोकरी लावण्यासाठी दिलेले ५० हजार रुपये वसूल करण्यासाठी रंगनाथ तोरडे गॅँगने गुंगा आरडे यांच्या कामठी (ता. श्रीगोंदा) येथील घरावर दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले
श्रीगोंदा (अहमदनगर) : भावाला नोकरी लावण्यासाठी दिलेले ५० हजार रुपये वसूल करण्यासाठी रंगनाथ तोरडे गॅँगने गुंगा आरडे यांच्या कामठी (ता. श्रीगोंदा) येथील घरावर दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी तीन दरोडेखोरांना अटक केली असून, अन्य दोघे फरार आहेत. दरोडेखोरांकडून एक बंदूक, चार काडतुसे आणि सोन्याचे गंठण जप्त करण्यात आली आहे.
श्रीगोंदा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी भिंगाण व कामठी येथे सापळा रचून रंगनाथ अंबादास तोरडे, सुरेश देवराव गायकवाड, महेंद्र गंडेचा काळे यांना अटक केली.
रंगनाथ तोरडेने २० वर्षांपूर्वी भाऊ रोहिदास तोरडे याला नोकरी लावण्यासाठी गुंगा आरडेला ५० हजार दिले होते. मात्र, रोहिदासला नोकरी लागली नाही. या पैशावरून रंगनाथ व गुंगा यांच्यात अनेकदा वाद झाले. नंतर रंगनाथ तोरडे हा चंदनतस्कर बनला. त्याचे अनेक गुन्हेगारांशी संबंध आले. पैसे वसूल करण्यासाठी गुंगा यांच्या बंद घरावर शनिवारी रात्री रंगनाथने पाच साथीदारांसह दरोडा घातला आणि एक बंदूक, पंधरा काडतुसे, सोन्याचे दागिने लंपास केले. (प्रतिनिधी)