शेगावात एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा

By Admin | Published: January 1, 2017 01:41 AM2017-01-01T01:41:08+5:302017-01-01T01:41:08+5:30

महिलेस मारहाण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

Robbery at three places in Shegaon at three places | शेगावात एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा

शेगावात एकाच रात्री तीन ठिकाणी दरोडा

googlenewsNext

शेगाव, दि. ३१- पहाटे ३ ते ४.३0 वाजताच्या सुमारास शहरात व्यंकटेश नगरात दोन ठिकाणी व जगदंबा नगरात एका ठिकाणी दरोडा पडल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी एका महिलेस मारहाण केली असून लाखोचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकाच परिसरात तीन ठिकाणी घरफोड्या झाल्यामुळे शहर सुरक्षिततेबाबत जनतेमध्ये शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अकोला येथून श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करून घटनास्थळाचे निरीक्षण करवून घेतले आहे.
पहाटे ३ ते ४.३0 वाजताच्या सुमारास पडलेल्या दरोड्याच्या घटनेतील प्राथमिक पाहणीनंतर पहिली घटना जगदंबा नगर येथील अँड. अजय तायडे यांच्या घरची दिसत असून अजय तायडे यांच्या घराचे समोरच्या लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून नंतर समोरच्या मुख्य दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. दरोडेखोरांना घरात काहीही मिळून न आल्याने त्यांनी या घरातून वकिली व्यवसायाच्या संबंधित कागदपत्रांची बॅग पळवली व त्यातील कागदपत्रे जवळच काही अंतरावर फेकली व बॅग घेऊन गेले. घटनेच्या वेळी दरोडेखोरांनी आजूबाजूच्या घरांच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावून घेतल्याचे आढळले. ही घटना घडली ते घर अँड. तायडे यांचे कार्यालय असल्यामुळे या घरात दरोडेखोरांना काहीच मिळाले नाही.
त्यानंतर दुसरी घटना जगदंबानगर लगतच्या व्यंकटेश नगरातील बबनराव गावंडे यांच्या घरी घडली. गावंडे यांच्या घराला बाहेरून कुलूप असल्याचे पाहून दरोडेखोरांनी मागच्या बाजूने खिडकीचे ग्रील तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाट, बॅग व डब्बे उघडल्याचे आढळले. गावंडे हे घरी नसल्यामुळे त्यांच्या घरातून काय चोरीला गेले, ते कळू शकले नाही. पोलिसांनी गावंडे यांच्या घराचे निरीक्षण करून पंचनामा केला आहे.
तिसर्‍या घटनेत व्यंकटेश नगरातच गावंडे यांच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या डॉ. काळमेघ यांच्या घराचे मागच्या बाजूने असलेल्या किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून घरात झोपलेल्या डॉ. काळमेघ यांच्या पत्नी सूचिता काळमेघ यांना मारहाण करून त्यांच्या व मुलगी स्वाती काळमेघ आणि वृद्ध आईच्या अंगावरील ८0 गॅ्रम सोन्याचे दागिने जबरीने काढून घेतले व घरातील ३0 हजार रुपये रोख र क्कम घेऊन पोबारा केला. दरोडेखोरांनी लाइट न लावता अंधारात डोळ्यावर बॅटरीचा लाइट चमकवून स्वत:ची ओळख पटू दिली नाही. घटनेच्या वेळी डॉ. काळमेघ हे समोरच्या खोलीत झोपलेले होते. घटनेची माहिती पहाटे ५ वा. काळमेघ यांनी पोलीस ठाण्यात फोनवर दिल्यानंतर रात्रपाळीवर असलेले एपीआय संजय अढाव यांनी लागलीच घटनास्थळ गाठून घटनेची चौकशी सुरू केली.
त्यानंतर सकाळी ७ च्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी रूपाली दरेकर, ठाणेदार यशवंत बाविस्कर, पीएसआय डी.बी. वाघमोडे यांनी घटनास्थळी पोहचून घटनेची चौकशी केली. तसेच अकोला येथील श्‍वानपथक व बुलडाणा येथील ठसे तज्ज्ञांना पाचारण करून घटनास्थळाचे निरीक्षण केले. घटनेचा तपास करून लवकरच दरोडेखोरांना गजाआड करू, असा आत्मविश्‍वास यावेळी पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेची माहिती शहरात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून एकाच परिसरात तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडण्याचा प्रकार घडल्यामुळे नागरिकांकडून सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात असून पोलिसांनी रात्रीची गस्त डोळ्यात तेल घालून करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Robbery at three places in Shegaon at three places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.