मुंबईत प्रथमच रोबोटिक मूत्रपिंड प्रत्यारोपण
By Admin | Published: July 6, 2017 04:55 AM2017-07-06T04:55:43+5:302017-07-06T04:55:43+5:30
मुंबईत प्रथमच यशस्वीपणे रोबोटिक मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट) करण्यात आली आहे. सर एच.एन. रिलायन्स
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत प्रथमच यशस्वीपणे रोबोटिक मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट) करण्यात आली आहे. सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारची संपूर्ण राज्यातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा या हॉस्पिटलकडून करण्यात आला आहे.
अंधेरी येथे राहणारे सी.एन. मुरलीधरन (५९) यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. गेल्या दीड वर्षांपासून ते डायलेसिसवर होते. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. उपचारासाठी त्यांना सर एच.एन. रिसायन्स फाउंडेशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. निदानाअंती मुरलीधरन यांच्या पत्नीला मूत्रपिंड प्रत्यारोपण हा एकच पर्याय असल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी पत्नी लीना (५५) हिने आपले एक मूत्रपिंड दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार, तिची तपासणी करण्यात आली. त्यानंतर, मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले.
हॉस्पिटल प्रशासनाच्या माहितीनुसार, ही शस्त्रक्रिया करताना आव्हाने होती. मात्र, सहकाऱ्यांच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.
संसर्गाचा धोका कमी
रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. गुस्ताद डावर यांनी सांगितले की, रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शस्त्रक्रियेत कमीत कमी रक्तस्त्राव झाला, तसेच प्रत्यारोपणानंतरचा संसर्गाचा धोका कमी झाला. जगातील खूप कमी सेंटरमध्ये या तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया केली जाते.
रुग्णाची प्रकृती स्थिर : मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरल्यास, शस्त्रक्रियेनंतर संसर्ग होण्याचा धोका कमी असतो आणि प्रकृती लवकर स्थिर होण्यास मदत होते. पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया करण्यात आली, हा वेगळा अनुभव होता. मूत्रपिंड दाता आणि प्रत्यारोपित करण्यात आलेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे, रुग्णालयाच्या युरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. इंदरबीर गिल यांनी सांगितले, तसेच टीमवर्कमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे स्पष्ट केले.