मुंबईत प्रथमच रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट
By admin | Published: July 5, 2017 11:42 AM2017-07-05T11:42:43+5:302017-07-05T11:59:19+5:30
मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल हे रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट करणारे राज्यातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, असा दावा या हॉस्पिटलकडून करण्यात आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल हे रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट करणारे राज्यातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, असा दावा या हॉस्पिटलकडून करण्यात आला आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या माहितीनुसार, ही शस्त्रक्रिया करताना आव्हानं होती. मात्र सहका-यांच्या सहाय्यानं ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट सामान्य ट्रान्सप्लांटच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. शिवाय ही शस्त्रक्रिया कमी वेळात पूर्ण होते. सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलनं अंधेरीतील सी.एन.मुरलीधरन यांच्यावर ही रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली आहे.
निकामी झाली होती किडनी
हॉस्पिटलनं दिलेल्या माहितीनुसार, सी.एन. मुरलीधरन (वय 59 वर्ष) यांची किडनी निकामी झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीनं प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणं गरजेचं होतं. मात्र किडनी मिळण्यास अडथळे येत असल्यानं मुरलीधरन यांना प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. पण यावेळी मुरलीधरन यांच्या अर्धांगिनी लीना (वय 55 वर्ष) यांनी आपली एक किडनी त्यांना देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत लीना यांनी सांगितले की, माझे पती गेल्या दीड वर्षांपासून डायलेसिसवर होते. त्यांची या त्रासातून सुटका व्हावी व सर्वसामान्यांप्रमाणे त्यांना आयुष्य जगता यावे, यासाठी मी त्यांना आपली एक किडनी देण्याचा निर्णय घेतला.
आणखी बातम्या वाचा
प्रत्यारोपणानंतर डायलेसिसच्या त्रासातून कायमची मुक्तता झाल्यानं मुरलीधरनदेखील फारच खूश झाले आहेत. सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलनं मुरलीधरन यांच्यावर रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेले किडनी प्रत्यारोपण ही राज्यातील पहिली शस्त्रक्रिया आहे. विशेष म्हणजे रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेत रक्तस्त्राव कमी होतो व संसर्ग होण्याची शक्यता कमी असते.
नेफ्रोलॉजिस्ट डॉ. श्रुती तापियावाला यांच्या मते, या रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेमुळे केवळ रुग्णच नव्हे तर दात्यालाही कमी वेदना होतात. वेदनेचे प्रमाण इतके कमी असते की त्यांना पॅरासिटामोलसारखी पेन किलर देण्याचीही गरज भासत नाही. दरम्यान, मुरलीधरन आणि त्यांची पत्नी दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.